अंधेरी न्यायालयाने विमानतळ पोलीसांना बॉलीवूड अभिनेता सलमान खानविरुद्ध गुंडगिरी आणि चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य रविंद्र द्विवेदी यांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने हे आदेश दिले. गेल्यावर्षी ४ नोव्हेंबर रोजी मुंबई-दिल्ली विमानप्रवासादरम्यान, सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रविंद्र द्विवेदी यांनी दाखल केली होती. द्विवेदी हे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे घेऊन दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला निघाले होते. मात्र, त्यावेळी अभिनेता सलमान आणि त्याचा अंगरक्षक विशाल विमानात आले. त्यांनी द्विवेदी यांना मारहाण करत त्यांच्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतल्याचे विमानतळावरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.सी. नागभिरे यांनी सांगितले. या घटनेनंतर द्विवेदी जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तेव्हा तेथील अधिकाऱ्याने त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही द्विवेदी यांनी केला आहे. न्यायालयाने आज निकाल सुनाविताना ३९२, ३२३, ५०४ आणि ५०६ या कलमांन्वये सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.