मत्रीणींवर छाप पाडण्यासाठी तसेच  मौजमजा करण्यासाठी मित्रांच्याच दुचाकींची चोरी करून त्यांची नंबरप्लेट बदलत त्या दुचाकी वापरणाऱ्या पाच तरुणांना नेहरू नगर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीमध्ये दोन पोलीस-पुत्रांचाही समावेश असून या तरुणांकडून चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

कुर्ला पूर्व श्रमजीवी नगर येथे राहणारे रोहन ओरवेल यांची दोन लाख रुपये किमतीची केटीएम मोटारसायकल १३ मे रोजी चोरीला गेल्याची तक्रार नेहरू नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता घाटकोपर पूर्व येथे राहणारा एक तरुण वेगवेगळ्या महागडय़ा मोटारसायकली घेऊन फिरत असल्याची माहिती उपनिरीक्षक पांडुरंग जाधव यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक झेले, शशिकांत माने, उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, सचिन वाघ, हवालदार – िहगे, बोडरे, इंगळे, घुगे, जायभाय, सरगर, दराडे आणि डोंगरे या पथकाने तेजस अंचल (२३) याला अटक करण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याने हा प्रकार आपल्या चार मित्रांच्या मदतीने केल्याचे सांगितले. यामाहितीवरून सचिन दरेकर (२४), अरुल वेगास (१९), अक्षय दिघे (२६) आणि गणेश बोट (१९) या तरुणांना अटक करण्यात आली. हे पाचही जण घाटकोपर पूर्व पंतनगर परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून महागडय़ा ७ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. हे पाच तरुण महागडय़ा मोटारसायकली असलेल्या मित्रांकडे एखाद्या कामासाठी किंवा एखादी फेरी मारण्यासाठी मोटारसायकल मागत असत. या वेळात, जाऊन मोटारसायकलच्या चावीची बनावट चावी हे तयार करत आणि मोटारसायकल परत नेऊन देत. त्यानंतर, काही दिवसांची वाट पाहून संधी मिळताच या मोटारसायकली चोरत असत.

केवळ चोरी करून न थांबता त्यांचा रंग आणि नंबरप्लेट बदलून त्या सर्रास वापरण्यात येत असत. विशेष म्हणजे, मोटारसायकलचा चेहरामोहरा बदलल्यानंतर त्या न विकता आपल्या मत्रिणींवर प्रभाव टाकण्यासाठी, ऐटीत फिरण्यासाठी त्याचा वापर करत असत, अशी माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांनी दिली. या तरुणांनी पंतनगर परिसरात सहा मोटारसायकलींची चोरी केली  आहे.