01 December 2020

News Flash

मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेने युतीत फूट

जागावाटप व सेनेची मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा त्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात असले तरी भाजपच्या महत्त्वाकांक्षांना फुटलेले धुमारेच युतीतुटीला कारणीभूत ठरले आहेत.

| September 26, 2014 04:59 am

महाराष्ट्राला काँग्रेसमुक्त करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील युती गुरुवारी अखेरीस संपुष्टात आली. जागावाटप व सेनेची मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा त्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात असले तरी भाजपच्या महत्त्वाकांक्षांना फुटलेले धुमारेच युतीतुटीला कारणीभूत ठरले आहेत. युतीप्रमाणेच १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही घटस्थापनेच्या मुहूर्तावर काडीमोड झाला. हे मैत्रीपर्व संपल्यानंतर आता या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून, त्यातील काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते.
राष्ट्रवादी सरकारमधूनही बाहेर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, या महत्त्वाकांक्षेमुळे १५१ जागा लढविण्यावर शिवसेना ठाम राहिली. भाजप आणि घटकपक्षांचे समाधान होईल, असे जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नाही आणि सर्व तोडगे व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे अखेर दु:खद भावनेतून शिवसेनेबरोबरची युती तोडत असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या नेत्यांनी जाहीर केले. अन्य चारही घटकपक्ष भाजपबरोबर असून त्यांच्याशी जागावाटप पूर्ण होत आले आहे. आगामी विधानसभा शिवसेनेला वगळून अन्य पक्षांच्या महायुतीने लढू, असे भाजपने जाहीर केले. शिवसेनेशी मैत्री कायम असल्याने आम्ही कोणतीही टीका करणार नाही व त्यांनी केली तरी त्याला उत्तर देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काही बडे नेते भाजपच्या वाटेवर
गेले काही दिवस महायुती टिकणार की नाही, याबाबत साशंकता होती आणि बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू होते. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या व अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी जागावाटप होऊ शकले नाही. दररोज काही तरी नवीन सूत्र पुढे येत होते व एकमेकांना दोष दिला जात होता. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जागावाटपामध्ये खेचाखेची व तणातणी ही नेहमीचीच होती. मात्र शेवट गोड होत होता व युती कायम राहत होती. त्यामुळे शेवटपर्यंत तोडगा निघेल, अशी आशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज हे हस्तक्षेप करतील, तडजोड होईल, या आशेने काही काळ दिवसरात्र बैठका झाल्या. युतीमध्ये ताटातूट झाल्यास घटकपक्षांना आपल्याबरोबर घेण्यासाठी शिवसेना व भाजपने जोरदार प्रयत्न केले; पण ते सर्व जण भाजपसोबत राहिल्याने अखेर शिवसेना एकटी पडली आहे. त्यांना सोबत घेऊन शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीने घेतला व प्रदेश कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषदेत तो जाहीर करण्यात आल. भाजपनेच युती तोडल्याने आतापर्यंतच्या सर्व साशंकता व चर्चावर अखेर पडदा पडला.महायुतीतील घटकपक्षांमध्येही अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते व तोडगा निघत नव्हता. भाजप किंवा घटकपक्षांच्या जागा कमी करण्याचे तोडगे आम्हाला मान्य नाहीत, असे सांगूनही शिवसेनेने सातत्याने तशीच सूत्रे मांडली. आपण दोघांनीही लवचीकता कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेला सांगितले. तरीही त्यांची भूमिका बदलली नाही. घटकपक्षांना वाऱ्यावर सोडून देणे योग्य वाटत नाही. शिवसेनेशी मैत्री मात्र कायम राहील.
– देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 4:59 am

Web Title: friendship over parties to break up chief minister post make break up
Next Stories
1 राष्ट्रवादी सरकारमधूनही बाहेर
2 काही बडे नेते भाजपच्या वाटेवर
3 स्त्रीवादाविरोधात स्त्रियांचाच ऑनलाइन एल्गार
Just Now!
X