दूरचित्रवाणी प्रसारण अधिक दर्जेदार होणार
डिजिटल बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणारा आपला देश नव्या वर्षांत याक्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. देशातील ६० टक्के, तर राज्यातील ७० टक्के केबल सेवा डिजिटल होणार आहे. यामुळे निमशहरांसह ग्रामीण भागात दूरचित्रवाणी प्रसारण अधिक दर्जेदार होणार आहे.
दूरचित्रवाणी प्रसारण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी केबल प्रणाली अ‍ॅनालॉगवरून डिजिटल करण्याची प्रक्रिया २०१२ पासूून सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील चार महानगरांमध्ये डिजिटायझेशन करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात देशातील ३८ मोठय़ा शहरांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यानंतरचा टप्पा हा सर्वात मोठा होता. त्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत असून यात सर्व महानगरपालिकांचा समावेश आहे.
हा टप्पा पूर्ण झाल्यावर देशातील ६० टक्के, तर राज्यातील ७० टक्के केबल सेवा डिजिटल होणार आहे.
हा टप्पा पूर्ण होत असतानाच केंद्राने चौथ्या टप्प्यातील काही ग्रामपंचायतींचा यात समावेश करावा, असे सांगितले.
याबाबत नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या एका बठकीत राज्यातर्फे मुदत वाढ मागण्यात आली. मात्र केंद्राने त्याला नकार देत हे काम पूर्ण न झाल्यास जूनी केबल प्रणाली बंद केली जाईल असे स्पष्ट केले. यामुळे राज्य सरकार व केबल चालक जोरात कामाला लागले आहेत. पण हे काम पूर्ण होण्यासाठी सेटटॉप बॉक्सचा तुटवडा व ग्रामीण भागातील वायरचे जाळे या अडचणी ठरत असल्याचे महाराष्ट्र केबल ऑपरेटर असोशिएशनचे अध्यक्ष अरिवद प्रभू यांनी स्पष्ट केले.
दरम्यान हे काम पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असून या कामात दूरसंचार कंपन्यांकडून काही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन ‘ट्राय’ने दिल्याचेही ते म्हणाले.
हा टप्पा पूर्ण झाल्यावरमहाराष्ट्रातील ७० टक्के केबल सेवा डिजिटल होइल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षीच्या १ जानेवारीला संपूर्ण देशातील केबल सेवा डिजिटल होणार आहे.