News Flash

एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ

गेल्या वर्षभरापासून चालू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा वेतन कराराचा झगडा अखेर शुक्रवारी यशस्वीपणे संपला. शुक्रवारी दुपारी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एसटीचे व्यवस्थापकीय

| June 22, 2013 03:31 am

एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ

गेल्या वर्षभरापासून चालू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा वेतन कराराचा झगडा अखेर शुक्रवारी यशस्वीपणे संपला. शुक्रवारी दुपारी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष दीपक कपूर व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी कराराच्या मसुद्यावर सह्या केल्या आणि कामगारांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. या करारातील तरतुदी जुलै महिन्याच्या वेतनामध्ये लागू होणार असल्याने ऑगस्ट महिन्यात एसटी कामगारांच्या घरी ‘दिवाळी’ साजरी होणार आहे.
अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या एसटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात यावी, ही मागणी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेबरोबरच इतर बिगर मान्यताप्राप्त संघटनांनीही केली होती. मात्र ही वेतनवाढ किती टक्के असावी, याबाबत प्रचंड मतभेद होते. अखेर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी केल्यानंतर १३ टक्के वेतनवाढीला उभयपक्षी मान्यता मिळाली.
या वेतन करारात कर्मचाऱ्यांना १३ टक्के वेतनवाढीसह इतर अनेक लाभ मिळाले आहेत. त्यामुळे कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांचा पगार ९ हजार रुपये झाला आहे. याआधी हे कर्मचारी साडेतीन ते चार हजार रुपये एवढय़ा तुटपुंज्या पगारावर काम करत होते.
सदर करार चार वर्षांसाठी असून या करारामुळे एसटी महामंडळावर २,०१६ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

कर्मचाऱ्यांना काय मिळणार?
*सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १३ टक्क्यांची वाढ
*दरवर्षी संचित दराने तीन टक्के वेतनवाढ
*सात हजार रुपयांपर्यंत वित्तलब्धी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी २५०० रुपये सानुग्रह अनुदान
* महागाई भत्ता
* घरभाडे व स्थानिक पूरक भत्ता
   धुलाई व शिलाई भत्ता
* नऊ रुपयांपासून १५ रुपयांपर्यंत रात्रवस्ती भत्ता
* दरमहा ५३ रुपये वैद्यकीय भत्ता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 3:31 am

Web Title: from july onward 13 percent salary increments for st employees
टॅग : St Employees
Next Stories
1 खासगी विद्यापीठांसाठी उद्योगसमूहांचा उत्साह ओसरला आरक्षणाच्या सक्तीमुळे तीनच प्रस्ताव
2 पालिकेची मंडई ‘झोपु’साठी बिल्डरला आंदण!
3 सूरज पांचोलीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
Just Now!
X