हा महाविजयी दशमी मेळावा आहे. असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय याचा गेल्यावर्षी याच दिवसापासून प्रारंभ झाला आणि आपण या राज्यात असत्यावर विजय मिळवून आजचा मेळावा साजरा करीत आहोत. यापुढे शिवसेनेच्या जीवनात जे जे काही होईल ते ‘महा’च होणार आहे. हीच महाविकास आघाडी पुढे दिल्लीचे तख्त राखायला गेला तरी कोणाला आश्चर्य वाटायला नको, ही तर सुरुवात आहे, असं प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

राऊत म्हणाले, “सर्वकाही सुरळीत असतं तर हा दसरा मेळावा जगानं दखल घ्यावी इतका भव्य झाला असता. हा महाविजयी दशमी मेळावा यासाठी आहे. असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याची गेल्यावर्षी याच दिवसापासून प्रारंभ झाला. आपण या राज्यात असत्यावर विजय मिळवून आपण आजचा मेळावा साजरा करीत आहोत. यापुढे शिवसेनेच्या जीवनात जे जे काही होईल ते ‘महा’च होणार आहे. महाविकास आघाडी दिल्लीचं तख्त राखायला गेली तरी कोणाला आश्चर्य वाटायला नको, ही सुरुवात आहे.”

“गेल्या वर्षी मी म्हणालो होतो पुढच्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. अनेकांना त्याच आश्चर्य वाटलं असेल, पण काही संकेत असतात त्यानुसार ते घडलं आहे. कोणी कितीही प्रयत्न केले, कोणी कितीही कारस्थान केली तरी हे सरकार पाच वर्ष पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या पाच वर्षांनी जनतेसोबत २५ वर्षांचा करार केल्यावर सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.