प्रसाद रावकर

जगभरातील वस्त्रप्रवाहाची दखल घेत ग्राहकाला हव्या असणाऱ्या ‘कोणत्याही ब्रँड’चे कपडे स्वस्तात उपलब्ध करून देणारा फॅशन स्ट्रीटचा थांबलेला बाजार आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. येथील दुकाने सशर्त उघडण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणाऱ्या येथील स्टॉलधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

मुंबईची ओळख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांमध्ये फॅशन स्ट्रीट अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या बाजारपेठेत प्रवाहात असलेल्या फॅशनचे कपडे खरेदी करण्यासाठी तरुणाई लोटते. मोठय़ा ब्रँडच्या नावाची आणि कपडय़ांची नक्कल करूनही येथे कपडे उपलब्ध होतात. दरांची घासाघीस

ही इथली खासीयत. करोनामुळे दक्षिण मुंबईमधील हा बाजार बंद करण्याचा आदेश पालिकेने १८ मार्चला जारी केला. त्यानंतर मुंबईत २४ मार्च रोजी टाळेबंदी आणि संचारबंदी लागू झाली. तब्बल सहा महिने फॅशन स्ट्रीटमधील दुकाने बंदच होती.

टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करताना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. ही बाब लक्षात घेऊन फॅशन स्ट्रीटमधील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र फॅशन मार्केट अनुज्ञापनधारक वेल्फेअर असोसिएशनने पालिकेला पाठविले होते. या पत्राची दखल घेत फॅशन स्ट्रीटमधील दुकाने सशर्त सुरू करण्यास परवानगी दिली.

थोडा इतिहास..

बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने पालिकेने महात्मा गांधी मार्गावर व्यवसाय करण्यासाठी ३९५ जणांना स्टॉल उभारण्यास परवानगी दिली. हळूहळू परवानाधारक स्टॉलच्या आजूबाजूने अनधिकृत स्टॉल्सची संख्या वाढत गेली. तसेच स्टॉल्सधारकांनी पदपथावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. वारंवार पालिकेकडून येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. असे असले तरी कपडय़ांच्या खरेदीसाठी फॅशन स्ट्रीट एक मोठी बाजारपेठ बनली. आता हा बाजार सुरू झाल्यावर उपनगर आणि मुंबईतील तरुणाई पुन्हा येथे खरेदीसाठी दाखल होणार आहे.

अटी काय?

* एक सोडून एक दुकान सम-विषम तारखेस सुरू राहील.

* विक्रेत्यांना मुखपट्टी आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

* परिसरात स्वच्छता राखावी लागेल. तसेच ग्राहकांची गर्दी होऊ नये याची काळजी विक्रेत्यांना घ्यावी लागणार आहे.

* अटींचे पालन न करणाऱ्या स्टॉलधारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.