गणेशभक्तांसाठी नवनवीन प्रकारचे मोदक

गणपतीचे आवडते खाद्य असलेले मोदक खायचे म्हटले की, गणेशोत्सव किंवा अंगारकीची वाट पहावी लागते. अशा वेळी खवय्यांना भावेल आणि हवे तेव्हा खाता येतील, अशा ‘फ्रोझन’ मोदकांची यंदा बाजारात ‘एन्ट्री’ झाली आहे. ‘ब्लास्ट फ्रिझिंग’ तंत्र वापरून तयार केलेले हे उकडीचे मोदक तब्बल तीन महिने टिकतात. त्याचबरोबरच चॉकलेट, काजू, मावा, रासबेरी, बटरस्कॉच, गुलकंद, मँगो, कोकोनट मोदकांबरोबर खास ‘डाएट’ करणाऱ्या भक्तांकरिता खजूर, जरदाळू असा सुक्या मेव्यापासून बनविलेले मोदक बाजारात उपलब्ध आहेत.

दादरच्या बेडेकरांनी या वर्षी प्रथमच ग्राहकांसाठी फ्रोझन मोदक हा प्रकार बाजारात आणला आहे. ‘ब्लास्ट फ्रिझिंग’ हे तंत्रज्ञान वापरून या मोदकांची निर्मिती करण्यात आली आहे. या एका मोदकाची किंमत २५ रुपये इतकी आहे. हे मोदक फ्रिजरमध्ये ठेवले तर तीन महिन्यांपर्यंत टिकू शकतात आणि त्यांची चवही टिकून राहते, असा दावा बेडेकर यांनी केला आहे. फ्रिजरमधून काढून १५ मिनिटे वाफेवर उकडल्यानंतर मोदक खाण्यासाठी तयार होतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी सांभाळून सण साजरे करावे लागतात. अशा वेळी सर्वानाच उकडीचे कळीदार मोदक तयार करणे शक्य नसते. या संकल्पनेतून फ्रोझन मोदकांची निर्मिती झाली. पहिल्याच वर्षी ग्राहकांनीही मोदकांना पसंती दर्शविली आहे. पाल्र्यातील बेडेकरांच्या दुकानात २५०० फ्रोझन मोदकांची मागणी आली आहे, असे बेडेकर दुकानातील मधुकाका यांनी सांगितले.

उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांबरोबरच मावा, चॉकलेट, मँगो, गुलकंद अशा वेगवेगळ्या चवीच्या मोदकांनाही ग्राहकांची पसंती लाभते आहे. यंदा काजू मोदक ९०० किलोपर्यंत पोहोचले असून मावा मोदकांची किंमत ६००वर गेली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत पेढे आणि मावा मोदकांच्या किमती फारशा वाढल्या नसल्याचे मावा आणि काजूच्या मोदकासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘पणशीकर’चे महादेव पणशीकर यांनी सांगितले. मोदक, पेढय़ांबरोबरच यंदाच्या गणेशोत्सवात दुधी वडी आणि श्रीखंडाचा खपही चांगला झाल्याचे त्यांनी सांगितले.  ‘शुगर फ्री’ मिठाईला ग्राहकांची विशेष मागणी असते. दादरच्या चांदेरकर मिठाई दुकानातील अंजीर, खजूर आणि जरदाळूची शुगर फ्री बर्फी यंदा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. माव्याच्या नरम पेढय़ांनाही यंदा चांगली मागणी आहे.