विक्रीला ‘ऑनलाइन’ व्यासपीठ; बेरोजगार तरुणांसाठी उत्पन्नाचे साधन

मुंबई : कठोर निर्बंधांमुळे सध्या फळे-भाज्या आदी अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या कालवधीतच खुल्या असल्याने फळ विक्रेत्यांनी आंबा विक्रीसाठी ऑनलाइन व्यासपीठाचा आधार घेतला आहे. तसेच करोनामुळे नोकरी किंवा व्यवसायात खंड पडलेल्या तरुणांनीही समाजमाध्यमांचा वापर करत आंबा विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. यामुळे विक्रीच्या बाबतीतही आंबा राजाच ठरला आहे.

बाजारपेठा सुरू ठेवण्यासाठी सकाळी ११ पर्यंतची मर्यादा आहे. सकाळी लवकर उठून बाजार करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यातही भाज्यांना पुरेशी मागणी असते परंतु सकाळच्या वेळेत फळांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, असे फळविक्रेत्यांचे म्हणणे आहे. ‘सध्या आंब्यांचा हंगाम असल्याने त्यालाच अधिक मागणी असते. विशेष म्हणजे तो वेळात विकला जाणे महत्त्वाचे असल्याने आम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचायचे ठरवले आहे. दुकाने जरी सकाळी ११ नंतर बंद होत असली तरी परिचित ग्राहकांना समाजमाध्यमांच्या आधारे आंब्याचे तपशील पाठवून मागणी नोंदवली जाते. याचा आम्हाला बराच फायदा झाला आहे.’ असे लालबाग येथील आंबे विकेत्यांनी सांगितले.

दादर येथील ‘ग्लोबल डेली’ या दुकानात अनेक जीवनावश्यक वस्तू मिळतात. आंबे विक्रीसाठी त्यांनीही समाजमाध्यमांचा वापर केला आहे. ‘ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अ‍ॅपची निर्मिती केली आहे,’ असे ग्लोबल डेलीच्या रिया पवार यांनी सांगितले.

करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. अशा बऱ्याच तरुणांनी आपल्या गावाकडचे आंबे थेट मुंबईत आणून व्यवसाय सुरू केला आहे. समाजमाध्यमांवरून  आंब्याची माहिती, दर, तपशील लोकांना देऊन करोनाकाळात घरपोच आंबे देण्याचा व्यवसाय अनेकांनी सुरू केला

आहे. ‘करोनामुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळतात. काहींना वैद्यकीय अडचणी असतात. अशांना घरपोच आंबा हवा असतो. आम्ही सर्व नियम पाळून ही सेवा देत आहोत,’ अशी माहिती राहुल वेळे या तरुणाने दिली.

नेपथ्यकार ते आंबा विक्रेता

देवाशीष भरवडे हा तरुण गेली काही वर्षे नाटय़ क्षेत्रात नेपथ्यकार म्हणून काम करत आहे. यंदा नाटय़ व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने पोटापाण्यासाठी आंबा व्यवसाय सुरु केला आहे. ‘नाटक बंद झाल्याने उपजीविकेसाठी काहीतरी करायला हवे या उद्देशाने त्याने आंबा विक्री सुरू केली. आंबा घरपोच करताना अडचण येत नाही. पोलीसही माहिती घेऊन सोडून देतात. फक्त प्रवासखर्च वाढत असल्याने त्याचाही विचार करावा लागतो,’ असे त्याने सांगितले.