बाजार कोसळला, रुपया घसरला.. * ऐन सणात भाज्या-फळे महाग * भारत बंदमुळे जनजीवन विस्कळीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : विघ्नहर्त्यां गणेशाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस उरले असतांना देशभरातील जनतेला सर्वच पातळीवर विघ्नांच्या वार्ताना सामोरे जावे लागत आहे.

सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे कारण पुढे करीत शहरातील किरकोळ भाज्यांचे दर दोनच दिवसांमध्ये किलोमागे वीस ते तीस रुपयांनी वधारले असून सर्वसामान्यांच्या खिशावर स्वयंपाकासाठी नवा आर्थिक भार पडणार आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाने नवा तळ गाठून शेअर बाजारावर परिणाम केला असून चालू वित्त वर्षांतील पहिली सर्वात मोठी सत्र आपटी सेन्सेक्सने नोंदविली, तर निफ्टीही कोसळला.

मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एकाच दिवसात १.९६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. इंधन दरवाढीच्या विरोधात एकीकडे काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला असला, तरी त्याचा परिणाम आर्थिक पातळीवर मोठा होता. इंधनविरोधी बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाहीत, असे स्पष्ट करून भाजपने इंधन दरवाढीबाबत हात झटकले. त्यानंतर सोमवारीच सरकारी कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २२ पैशांनी वाढ केली. इंधन दरवाढीच्या फेऱ्यात पुढल्या काही दिवसांमध्ये खिशावरील वाढीव संकटांना तोंड जनतेला सणांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

दिल्लीकरांचा अत्यल्प प्रतिसाद

नवी दिल्ली : कुठल्याही मुद्दय़ावर काँग्रेसला सहकार्य न करणारा ‘आम आदमी पक्ष’ सहभागी होऊन देखील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह २२ विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला खुद्द दिल्लीत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, रामलीला मैदानावरील आंदोलनात विरोधकांची एकी दिसून आली. येथे झालेल्या प्रतीकात्मक बंदमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मनमोहन सिंग तसेच पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव आदी नेतेही सहभागी झाले होते. या नेत्यांबरोबर ‘आप’चे नेते संजय सिंहही होते. जंतरमंतरवर ‘आप’च्या नेत्यांसह माकपचे सीताराम येचुरी यांनीही निदर्शने केली.

राहुल गांधी यांची टीका

राहुल गांधी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर मानसरोवर यात्रेहून आणलेले पाणी अर्पण केले. त्यानंतर ते रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी आले. राहुल यांनी मोदी सरकारच्या धोरणावर सणकून टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी आम्ही विरोधक एकत्रित प्रयत्न करू, असे राहुल यांनी सांगितले.

१५ रुपयांनी दर कमी होतील!

कॉंग्रेस पक्षप्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पेट्रोल-डिझेल वस्तू व सेवा करात आणण्याची मागणी केली. पेट्रोल-डिझेलचा दर किमान १५ रुपयांनी कमी होऊ शकतो असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel price hike bharat bandh protests rupee closes at record low
First published on: 11-09-2018 at 04:03 IST