निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबीयांना वाटप करण्यात येत असलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त करतानाच कोकणातील एकही नुकसानग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या तसेच मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात कोकणाचे तब्बल सहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाला सर्वाधिक फटका बसला असून घरांचे, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारने तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून या मदतवाटपाचा आढावा घेतला. त्या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मदत कशी?

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निधीतून किमान ११०० कोटींची मदत मागण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त लोकांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्य़ासाठी ३७२ कोटी ९७ लाख, रत्नागिरीसाठी ११६ कोटी ७८ लाख आणि सिंधुदुर्गसाठी ३७ कोटी १९ लाख असे ४९० कोटी १३ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही तात्काळ देण्यात यावी यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. पावसामुळे रस्ते, वीजपुरवठा मोबाइल संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्यात अडचणी येत असल्या तरी यामधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करा.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे</p>