25 November 2017

News Flash

अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ वेतन

एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 19, 2017 2:51 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रात्रशाळांतील शिक्षकांना दिलासा; एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा

राज्यातील रात्रशाळांमधील शिक्षकांची एका तपाची प्रतीक्षा अखेर संपली असून आता या शाळांमधील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पगार मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार एकाच वेळी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये नोकरी करून रात्रशाळेतही घुसखोरी करणाऱ्या शिक्षकांना चाप लागणार आहे. यापुढे रात्रशाळांमध्ये काम करणारा शिक्षक हा पूर्णवेळ शिक्षक म्हणून गणला जाणार आहे. शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तसेच या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी रात्रशाळेत या मुलांना सामावून घेण्यासाठी खास तरतूद करण्यात आली असून वयाच्या अकराव्या वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असला तरी प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट मात्र लागू राहणार नाही याचीही खास तरतूद या निर्णयातून करण्यात आली आहे.

राज्यात आत्तापर्यंत रात्रशाळांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, मात्र या निर्णयामुळे या शाळा आता अर्धवेळ शाळा म्हणून गणल्या जातील.

प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाचीही बायोमेट्रिक हजेरी केली जाणार असून अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे लाभ या शाळेतील शिक्षकांना मिळणार आहेत. यात वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शालेय वेतन प्रणाली, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाने भरती धोरणही लागू राहणार आहे.

विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळणार

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रयोगशाळेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तूर्तास आजूबाजूच्या शाळेतील प्रयोगशाळांचा वापर करता येईल, मात्र त्या-त्या शाळांमध्ये प्रयोगशाळांसाठी अनुदानही मंजूर केले जाणार आहे.

First Published on May 19, 2017 1:50 am

Web Title: full salary to half time teacher