पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्याने गेले २० वर्षे संथ गतीने काम सुरू असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग उभारणीचा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी १४१३ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिल्याने आता रेल्वे खाते हा प्रकल्प किती गांभिर्याने घेते यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. २००९मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तेव्हा हजार कोटींच्या खर्चापैकी ५०० कोटी खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण प्रकल्पाचा खर्च वाढल्याने काम रखडले होते. गेल्याच आठवडय़ात पंतप्रधानांनी मुख्य सचिवांबरोबर केलेल्या व्हिडिओ कॉन्सफरसिंगमध्ये नगर-बीड रेल्वे मार्गाबद्दल विचारणा केली होती. खर्च वाढला तरी राज्य सरकारकडून वाढीव खर्चास मान्यता दिलेली नाही याकडे रेल्वे मंत्रालयाने लक्ष वेधले होते.