विश्व मराठी साहित्य संमेलनाबाबत घटना दुरुस्तीची रितसर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनासाठीचे नियम आणि बदलांना धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळाल्याशिवाय या संमेलनासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. घटना दुरुस्तीला अद्याप मंजुरी मिळालेली नसतानाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता लंडन येथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजनाचे डोहाळे लागले आहेत. महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.  
साहित्य महामंडळाचे कार्यालय आता येत्या १ एप्रिलपासून मुंबई मराठी साहित्य संघ या महामंडळाच्या घटक संस्थेकडून महाराष्ट्र साहित्य परिषद या घटक संस्थेकडे जाणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा प्रस्ताव मंजुर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोत पार पडले. या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनावरून महामंडळाच्या घटक संस्थात वाद झाले होते. साहित्य महामंडळाच्या घटनेत विश्व मराठी साहित्य संमेलनाची तरतूद नव्हती. त्यामुळे हे संमेलन बेकायदा असल्याची भूमिका महामंडळाच्या काही घटक संस्थांनी घेतली. मात्र तरीही साहित्य महामंडळाचे कार्यालय मराठवाडा साहित्य परिषदेकडे असताना पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन ‘कवती’काने रेटून नेण्यात आले. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटो येथे होणार होते. मात्र आयोजक संस्था आणि महामंडळ यांच्या वादात ते बारगळले. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनानंतर महामंडळाच्या घटनेत बदल करण्यात येऊन या संमेलनासाठीचे नियम करण्यात आले. त्यांना महामंडळाच्या घटक संस्थांकडून मान्यताही देण्यात आली.
महामंडळाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे झालेली असल्याने घटनेत करण्यात आलेल्या कोणत्याही बदलांना धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळणे तसेच या संदर्भात महामंडळाकडून सूचक-अनुमोदकासह ठराव मंजुर करणेही आवश्यक आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. असे असतानाही महामंडळाच्या त्या बैठकीत लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून आलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता मिळाल्याशिवाय विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळणार नाही, असे पत्र आपल्याला देण्यात आले आहे. त्याकडेही या बैठकीत काही सदस्यांनी लक्ष वेधले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.