‘‘डिजिटल शाळा तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून मराठी शाळांकडे पालक आणि मुलांचा ओढा वाढत आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

‘मराठी भाषेसाठी आश्वासने नको, कायदा करा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणांनी सोमवारी आझाद मैदान दणाणून गेले होते. ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संस्थांनी मराठी विषयीच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आंदोलन केले. मराठी साहित्यिक, प्रकाशक, लेखक, शिक्षक, पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी हरी नरके यांनी आपल्या भाषणातून मराठी माध्यमातून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. उलट फायदाच होतो, हा मुद्दा त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला. निवडणुकांच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे मराठी बाबतच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात, धोरण नको तर कायदा व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोत्तापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षां उसगांवकर आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय सक्तीचा करणे, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवनाची निर्मिती, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न आदी विषयांवर चर्चा झाली.

यावेळी फडणवीस म्हणाले, ‘‘अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र हे अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. मराठी मुलांना मराठी शाळांची ओढ आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुले नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. राज्याकडे शालेय शिक्षणासाठी संसाधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि यापुढेही ती भासू दिली जाणार नाही. पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक प्रयत्न केले जातील.’’

मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले, मराठी भाषा संवर्धनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सर्वाचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे स्वागतच आहे.

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, आमदार नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी चर्चेवेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत समाधानी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.