शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवर झालेला सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च मुंबईकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेकडून होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी ठेकेदाराला हे पैसे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसेने ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवले आहे. मात्र, अंत्यसंस्कारांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या शिवसेनेला हे पाच लाख रुपये जड झाले आहेत का, असा सवाल पालिका वर्तुळात विचारला जात आहे.
शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवाजी पार्कवर लोटली होती. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने तेथे मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उप पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून पालिकेने मैदान व परिसरात सीसीटीव्ही, मोठे एलईडी स्क्रीन व अन्य काही आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. ही सर्व व्यवस्था मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आली होती. वेळेअभावी निविदा मागविणे शक्य नसल्यामुळे केवळ दरपत्रिका मागवून ‘मेसर्स बसेरा डिजिटल सिस्टम प्रा. लि.’ या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले. आता या खर्चाला कार्योत्तर मंजुरी घेण्याची आठवण पालिका प्रशासनाला झाली असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांच्या आलिशान गाडय़ांची किंमत साधारणपणे १० लाख रुपयांच्या वर आहे. या नगरसेवकांचे राहणीमान लक्षात घेता कोणाही नगरसेवकाने शिवसेनाप्रमुखांवरील प्रेमाखातर या खर्चासाठी खिशात हात घातला असता तर करदात्यांच्या खिशावर डल्ला मारण्याची वेळ प्रशासनावर ओढवली नसती, अशी तीव्र प्रतिक्रिया पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.