दफनभूमीसाठी रस्ताच नसल्याने रहिवाशांना मनस्ताप

दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ला परिसरातील रहिवाशांसाठी कसाईवाडा परिसरात केवळ एकच दफनभूमी असून या ठिकाणी जाण्यासाठी अद्यापही रस्ताच तयार करण्यात आलेला नाही. परिणामी कुर्ला रेल्वे स्थानकावरून रहिवाशांना मृतांची अंत्ययात्रा काढावी लागत आहे. यामध्ये रहिवाशांसह प्रवाशांनादेखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

गेल्या शंभर वर्षांपासून कुर्लावासीयांसाठी कसाईवाडा परिसरात एकमेव दफनभूमी आहे. सध्या या दफनभूमीची मोठी दुरवस्था आहे. मात्र राजकीय नेते केवळ निवडणुकीपूर्वी या दफनभूमीला भेट देऊन विकास करण्याचे आश्वासन देऊन निघून जातात. यापलीकडे येथे काही झाले नाही. त्यातच कसाईवाडा परिसर हा कुर्ला रेल्वे स्थानकापासून लांब असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी एखादा पादचारी पूल तयार करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशी करत आहेत. मात्र शासनाने अद्यापही या ठिकाणी पूल अथवा रस्तादेखील बनवलेला नाही. परिणामी वस्तीत कुणाचा मृत्यू झाल्यास त्याची अंत्ययात्रा रेल्वेपूल आणि त्यानंतर फलाटावरून काढावी लागले. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ आणि ८ वरून हार्बर रेल्वे जाते. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा वेळी याच फलाटावरून ही अंत्ययात्रा काढावी लागते. अंत्ययात्रेत

सहभागी झालेल्यांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल गाडी स्थानकात आली असताना अंत्ययात्रा या ठिकाणी आल्यास एकाच वेळी फलाटावर मोठी गर्दी उसळते. परिणामी चेंगराचेंगरी होण्याची भीतीदेखील प्रवाशांमध्ये असते.

दफनभूमीसाठी रस्ता अथवा एखादा पादचारी पूल तयार करण्यात यावा यासाठी रहिवाशांनी अनेकदा येथील आमदार आणि खासदारांकडे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र त्यांच्याकडून आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांवर बहिष्कार घालून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.