पसंतीक्रम बदलण्याच्या नव्या नियमामुळे सर्वच शाखांचे कटऑफ वाढले
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील नव्या नियमावलीमुळे यंदा प्रथमच सर्व शाखांचे दुसऱ्या प्रवेशफेरीचे कटऑफ पहिल्या प्रवेशफेरीच्या तुलनेत वर गेल्याचे समोर आले आहे. या वर्षी प्रत्येक प्रवेशफेरीनंतर महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचे प्रत्येक फेरीला उतरत्या क्रमाने येणारे कटऑफचे गणित बदललेले असून ते महाविद्यालयातील उर्वरित जागा आणि विद्यार्थ्यांची पसंती यावर ठरणार आहे.
अकरावीच्या प्रवेशाची दुसरी यादी गुरुवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच शाखांचे कटऑफ वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मुख्यत: कला शाखांचे कटऑफ वाढल्याचे आढळून आले आहे. यंदा कटऑफ अचानक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रक्रियेमध्ये आणण्यात आलेले नवे नियम. मागील वर्षांपर्यत विद्यार्थ्यांनी एकदाच त्याचे पसंतीक्रम भरायचे आणि त्यानंतर प्रवेशफेऱ्यांची वाट बघायची, अशी प्रथा होती. तसेच फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये तात्पुरता प्रवेश घेऊन अन्य फेऱ्यांमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची वाट मागील वर्षी विद्याथ्र्यी पहायचे. या दोन नियमांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवेशफेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला की विद्यार्थ्यांचे नाव अन्य फेऱ्यांमधून बाद केले जाते. यामुळे महाविद्यालयातील जागांमध्ये आत्तापर्यंत असणारी अनिश्चितता या वर्षी नसणार आहे. परिणामी प्रत्येक फेरीनंतर महाविद्यालयातील रिक्त जागांची निश्चित संख्या विद्यार्थ्यांना समजत आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक प्रवेश फेरीनंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येणार आहे. या वर्षी विद्यार्थ्यांना तात्पुरत्या प्रवेशाची शाश्वती नसल्यामुळे पहिल्या दहा पसंतीक्रमांपैकी योग्य पसंतीक्रमाची रिक्त जागांनुसार निवड करावी लागणार आहे. पहिल्याच महाविद्यालयाचा अट्टहास केल्यास विद्यार्थ्यांना खालच्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागेल.
आत्तापर्यंतच्या प्रवेशफेऱ्यांमध्ये महाविद्यालयांचा क्रम हा प्रत्येक फेरीला सारखाच असायचा, त्यामुळे कटऑफ ही प्रत्येक फेरीनंतर खालीच येत होती; परंतु या वर्षी बदलेल्या नियमांमुळे प्रत्येक प्रवेश फेरी ही नव्याने राबविण्यात येत आहेत. तिची आधीच्या फेऱ्यांशी तुलना होऊ शकणार नाही, असे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या वर्षी आमच्या महाविद्यालयाचा कला शाखेचा कटऑफ वर आल्याचे पाहून आम्हालाही धक्का बसला होता; परंतु नव्या नियमावलीमुळे हा बदल घडलेला आहे. यामुळेच कला शाखेचे कटऑफ यंदा वाढले आहेत, असे मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 3:31 am