अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सराव व्हावा यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. fyjc.org.in/Mumbai या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरता येईल.
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) भागात राबविली जाते. या भागातील विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आपले अर्ज संकेतस्थळावर भरता येणार आहेत. अर्जावरील आपली वैयक्तिक माहिती विद्यार्थ्यांनी भरून ठेवावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात त्यासाठी भरावयाचे पर्याय अर्ज त्या त्या राज्य विभागीय मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर भरायचे आहेत. माहितीपुस्तिकेत गेल्या वर्षी ऑनलाइनमध्ये भरल्या गेलेल्या जागांची कटऑफ यादीही आहे. विद्यार्थ्यांनी या यादीचा अभ्यास आपले महाविद्यालयांचे पर्याय भरताना करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘राज्य शिक्षण मंडळा’च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये अकरावीचे अर्ज आणि माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. तर राज्याबाहेरील शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाकरिता ४७ केंद्रांची सोय करण्यात आली आहेत. या वर्षी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चार हजार नवीन जागांची भर पडली आहे. तब्बल १,५३,४७८ जागांकरिता ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. त्यात कला शाखेच्या २२,८६६, वाणिज्य शाखेच्या ४४,२१० आणि विज्ञान शाखेच्या ८६,४०२ जागांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 4:22 am