चौदा महाविद्यालयांना नव्याने मंजुरी

मुंबई आणि उपनगरांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा अकरावीची प्रवेश क्षमता साडेनऊ हजार जागांनी वाढणार असून त्यातील चार हजार जागा या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार आहेत. मुंबई आणि उपनगरांत नव्याने चौदा महाविद्यालये सुरू होत आहेत.

मुंबई आणि उपनगरांमधील अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये यंदा वाढ होणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली असून या महाविद्यालयांमध्ये नऊ हजार ६७० जागा वाढणार आहेत. गेल्या वर्षी (२०१७-१८) मुंबईमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता दोन लाख ९२ हजार ९० होती. यंदा ती तीन लाख एक हजार ७६० असणार आहे.

वाढलेल्या जागांमध्ये संस्थांतर्गत प्रवेशासाठीच्या राखीव जागा (इनहाऊस कोटा), व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा वगळून एक लाख ६३ हजार ९४६ जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार आहेत. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी एक लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध होत्या. मुंबईतील गेल्या काही वर्षांचा प्रवेशाचा कल पाहता वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून चार हजार ४६० जागा वाढल्या आहेत. विज्ञान शाखेच्या तीन हजार ७६० जागा तर कला शाखेच्या एक हजार १४० जागा वाढल्या आहेत. किमान कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या (एमसीव्हीसी) ११० जागा वाढल्या आहेत.

नवे महाविद्यालय कुठे?

नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयांमध्ये गोवंडी, कुर्ला, कल्याण, आंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा रोड, कामोठे येथे प्रत्येकी एक महाविद्यालय सुरू होत आहे, तर ठाणे कांदिवली येथे प्रत्येकी दोन महाविद्यालये सुरू होत आहेत.