आपल्या आसपास असलेल्या उत्तमोत्तम ब्रँडच्या या दुकानांमध्ये नेमके काय उपलब्ध आहेत. कोणत्या ऑफर्स आहेत याचा तपशील आपण जेव्हा सुट्टीच्या दिवशी बाजारात फेरफटका मारायला जातो तेव्हा कळतो. अनेकदा आपल्याला आपल्या घराजवळ अमुक ब्रँडचे दुकान सुरू झाले आहे तेथे अमुक इतक्या कालावधीसाठी सवलतीत विक्री सुरू होती असा तपशील खूप उशिराने कळतो. यामुळेच आपल्या घराशेजारील ऑफलाइन ब्रँड बाजार ऑनलाइन आणून अवघ्या तासांमध्ये सामान घरपोच देणारी सुविधा सुरू झाली असून ती ‘फाइंड’ या नावाने ओळखली जात आहे.

आयआयटीयन फारुक अदाम, हर्ष शाह आणि एम. जी. श्रीमन या त्रिकुटाने २०१२ मध्ये किरकोळ विक्रेत्यांना ब्रँड्सना जोडण्यासाठी शॉपसेन्स नावाने एक तंत्रस्नेही व्यासपीठ खुले करून दिले. पण २०१५ मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत त्या सामान्य ग्राहकांसाठी खुल्या करण्याचे ठरविले. हे करत असताना ते इतरांपेक्षा वेगळे असावे याकडे त्यांचे लक्ष होते. यामुळेच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व ब्रँड्सच्या शहरातील शो रुम्सची माहिती उपलब्ध करून देण्याचे ठरविले. लोकांना मॉलमध्ये किंवा बाजारात न जाता घरबसल्या खरेदी करता यावी असा विचार त्यांनी केला. हा विचार करत असतानाच त्यांनी सध्या स्पध्रेत असलेल्या ई-व्यापार संकेतस्थळांचा विचार केला. या संकेतस्थळांपेक्षा वेगळे करण्यासाठी त्यांनी तीन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष दिले. ते म्हणजे स्वत: कोणत्याही प्रकारचा साठा करावयाचा नाही. इतरांच्या तुलनेत कमी किमतीत वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आणि ग्राहकांना अवघ्या काही तासांत वस्तू घरपोच द्यायची. यासाठी त्यांनी शहरांतील ब्रँड्सच्या दुकानांची मदत घेऊन त्यांचा सर्व तपशील ‘फाइंड’ या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिला. याचबरोबर हा तपशील https://www.gofynd.com// या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ फॅशनचे संकेतस्थळ म्हणून ओळखले जात असल्यामुळे फॅशनशी संबंधित सर्व वस्तू या अ‍ॅपवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात खरेदी करणे सोपे जावे यासाठी वस्तूंची विविध गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यांच्या या संकल्पनेला सध्या नाइकी, पुमा, रेड टेप, पीटर इंग्लंड अशा २००हून अधिक ब्रँड्सनी साथ दिली आहे. या ब्रँड्सच्या दुकानांमधून थेट ग्राहकाच्या घरी सामान पोहोचण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे. या कंपनीच्या अ‍ॅपला जानेवारी महिन्यात केवळ दहा हजार डाऊनलोड्स मिळाले होते. मात्र त्यांनी समाज माध्यमांचा वापर करून केलेल्या विपणनानंतर हे अ‍ॅप अवघ्या एका महिन्यात एक लाख डाऊनलोड मिळणारे ठरले. अ‍ॅपची उपयुक्तता आणि त्याचा वापरकर्त्यांसाठीचा सुलभपणा यामुळे लोक याला पसंती देत असल्याचे फारुक सांगतो.

असे चालते काम

हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याचे मुखपृष्ठ इतर ई-व्यापार संकेतस्थळांपेक्षा वेगळे दिसते. विविध ऑफर्सबरोबरच ब्रँड्सनुसार उत्पादन निवडण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. यामुळे ब्रँडप्रेमी ग्राहकांना अल्पावधीत त्यांच्या आवडत्या ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करणे शक्य होते. याशिवाय पुरुष व महिला यामध्येही उत्पादनांची गटवारी करण्यात आली आहे यामुळे प्रत्येक वापरकर्ता त्याच्या आवडीनुसार सुलभ खरेदी याद्वारे करू शकतो. कंपनीने नुकतेच ओला कॅबशी सहकार्य करार केला आहे. यामुळे ओला कॅबच्या प्राइम या वर्गवारीतील गाडय़ांमध्येही खरेदीचा अनुभव घेता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या परिसरातील ब्रँड्सच्या दुकानांनुसार वस्तूंचा शोध घेणे शक्य असल्यामुळे वस्तूची खरेदी केल्यावर शहरांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये वस्तू घरपोच उपलब्ध होणे शक्य झाले आहे.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

या कंपनीत सुरुवातीची गुंतवणूक ही संस्थापकांनी केली. मात्र २०१५मध्ये केई कॅपिटल आणि स्नॅपडीलच्या संस्थापकांनी यामध्ये गुंतवणूक करून कंपनीला हातभार लावला. ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी झाल्यानंतर त्यांच्या मिळकतीचा २० टक्के भाग फाइंडला मिळते हेच कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत आहे.

भविष्याची वाटचाल

सध्या असलेल्या २२० ब्रँड्सची संख्या ४०० ते ४५० पर्यंत नेणे व दिवसाला होणाऱ्या एक हजार व्यवहारांची संख्या दहा हजारांपर्यंत नेणे हे येत्या काळातील मुख्य उद्दिष्ट असल्याचे फारुक सांगतो. याचबरोबर समाज माध्यमांवरून काही प्रमाणात जाहिरात करून व्यवसायवृद्धी करण्याचा मानसही त्याने बोलून दाखविला.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हा प्रवास खूप मोठा असतो. आपण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठरविलेल्या वेळेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वेळही लागू शकतो. मात्र संयम न हरवता काम करत राहावे असा सल्ला फारुकने नवउद्यमींना दिला आहे. तसेच आपला व्यवसाय हा मोठय़ा बाजारपेठेसाठी कसा योग्य ठरेल यादृष्टीने सतत विचार करा असेही फारुकने नमूद केले.

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit