इतिहासाशी प्रामाणिक राहून, ऐतिहासिक मूल्यसंघर्ष उभा करण्याचे काम गो. पु. देशपांडे यांच्या नाटय़कृतींनी केले, तर वैचारिक शिस्त राखत प्रस्थापितांचा सत्ताव्यवहार आणि डाव्यांमधील विसंगती यांना त्यांनी राजकीय समीक्षक या नात्याने टीकेचे लक्ष्य केले.
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या गोपुंच्या पहिल्याच नाटकाने केवळ मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीलाही राजकीय नाटकांचे नवे दालन उघडून दिले. राजकीय पाश्र्वभूमीवरची, राजकीय परिस्थितीचे चित्रण करणारी नाटके जरी आजवर लिहिली गेली असली तरी गोपुंच्या नाटकांमधून प्रथमच राजकीय परिस्थितीवरचे भाष्य, निरनिराळ्या विचारप्रणालींमधला वैचारिक संघर्ष व्यक्त झाला. या नाटकाचे दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांनी केले होते तर त्यातील प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. दुबेंनी गोपुंविषयी म्हटले होते, ‘ज्याची नाटके राजकीय किंवा राजनैतिक आहेत असा नाटककार एक गो.पुं.चा अपवाद वगळता मला तरी आढळला नाही.’ तर डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ‘मानवी जीवनातील शोकात्म विसंगतींना न्याय देऊ शकेल असा, गो.पुं.शिवाय दुसरा नाटककार मला दिसत नाही.’ आपल्या वैचारिक आणि ललित लेखनातून परिवर्तनवादी विचारांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा या आपापल्या विचारप्रणालीशी घट्ट बांधलेल्या दिसतात. व्यक्तिरेखा आणि त्यांचे परस्परातील ताणतणाव ही गो.पुं.च्या नाटकांची जमेची बाजू मानली जाते. या व्यक्तिरेखांमधला वैचारिक संघर्ष हाच गो. पुं.च्या नाटकाचा गाभा आहे.
गोपुंनी काही वर्षांपूर्वी म. फुले यांच्यावर लिहिलेल्या ९३-९४ साली लिहिलेल्या ‘सत्यशोधक’ या नाटकाचे अतुल पेठे यांनी मुक्ता मनोहर यांना सोबत घेऊन पुणे महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रभर प्रयोग केले. तेव्हा या नाटकावरून तथाकथित फुलेप्रेमींनी गोपुंवर अतिशय निर्गल भाषेत टीकाटिपणी केली होती. परंतु त्याला गोपुंनी काहीही महत्त्व न देता आपला विवेकी बाणा दाखवून दिला.  ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’मध्ये त्यांनी अनेक वर्षे सदर लिहिले. ‘आर्टस अँड आयडियाज’ या नियतकालिकाचे त्यांनी आठेक वर्षे संपादन केले, तर काही काळ सहयोगी संपादक म्हणून काम केले.
नुकताच त्यांच्यावर कोल्हापूरच्या अनिल सडोलीकर यांनी  ‘बहुआयामी गो. पु.’ हा दीड तासाचा लघुपट तयार केला असून त्याचे नोव्हेंबर महिन्यात अभिनेते ओम पुरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
नाटके – उद्ध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, मामका: पांडवाश्चैव:, चाणक्य विष्णुगुप्त, सत्यशोधक, एक वाजून गेला आहे, अस्सा नवरा सुरेख बाई, अखेरचा रस्ता, रस्ते, शेवटचा दिस, म्युझिक सिस्टिम.
समीक्षात्मक लेखन – मराठी – संतसाहित्य, भारतीय तत्त्वज्ञान.
इतर पुस्तके – रहिमतपुरकरांची निबंधमाला (भाग १ व २), इत्यादी इत्यादी कविता (कवितासंग्रह).
इंग्रजी – कल्चर अँड पॉलिटिक्स, डायलेक्टिस ऑफ डेफिट – प्रॉब्लेम्स ऑफ कल्चर इन पोस्ट-कलोनियल इंडिया, २००६, इंडियन प्लेज इन ट्रान्सलेन्शन, मॉडर्न इंडियन ड्रामा (संपादित), टॉकिंग पॉलिटिक्स कल्चरली, द वर्ल्ड ऑफ आयडियाज इन मॉडर्न मराठी, सिलेक्टेड रायटिंग्ज ऑफ जोतीराव फुले.
संपादन – आर्ट्स अँड आयडीयाज मॅगझीन. दूरचित्रवाणी मालिकांसाठी लेखन – भारत एक खोज, शिवाजी, महात्मा जोतिबा फुले, चाणक्य, सुरत काँग्रेस. चित्रपटासाठी संवाद लेखन – द्रोहकाल, देव. अभिनय – नाटक- घाशीराम कोतवाल, एक तमाशा अच्छा खासा, चित्रपट – थांग, पुणे ५२.
 पुरस्कार – महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९७७, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९६ ,सातारा भूषण पुरस्कार, २००५, महाराष्ट्र फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार, २००९