संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा व कारकिर्दीचा वेध
मराठी पत्रसृष्टीतील भरजरी पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकरांच्या साक्षेपी संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा आणि कारकीर्दीचा वेध घेणाऱ्या ग्रंथावर काम सुरू झाले आहे. १९६०च्या दशकापासून पुढची २४ वर्षे महाराष्ट्राचा व्यापक धांडोळा घेणाऱ्या ‘माणूस’ची विविध रूपे तसेच माजगावकरांचे ‘माणूस’पणही उलगडणार आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक भावजीवन समृद्ध करण्यात ‘माणूस’ साप्ताहिकाने स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आहे. माजगावकरांनी विवेकबुद्धीला संवेदनशीलतेची जोड देऊन त्या काळातील अनेक सामाजिक विषयांवर नव्या दमाच्या लेखकांना लिहिते केले. नक्षलवाद, जयप्रकाश नारायण यांची चळवळ, शेतकरी नेते शरद जोशी यांची आंदोलने, एक राष्ट्रशक्ती म्हणून चीनचा झालेला उदय आणि ग्राम सुधार हे माजगावकरांचे खास जिव्हाळ्याचे विषय होते.
त्याचप्रमाणे टॉलस्टॉय (सुमती देवस्थळे), एक होता काव्‍‌र्हर (वीणा गवाणकर), गुरुदत्त (भाऊ पाध्ये) अशा अवलिया व्यक्तिमत्त्वांवरही ‘माणूस’ मधून लिहून आले. तत्कालीन विषयांवर ‘श्रीगमा’ अनेकदा खास पुरवण्या किंवा विशेषांकही काढत. ‘माणूस’ साप्ताहिक म्हणजे अनेक ज्येष्ठ आणि उदयोन्मुख लेखकांचे जणू ‘साहित्य संमेलन’च असायचे. विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, अरुण साधू, वि. ग. कानिटकर, अशोक जैन, विनय हर्डीकर, कुमार सप्तर्षी, रवींद्र पिंगे, अनंत भावे, दि. बा. मोकाशी, गिरीश प्रभुणे, मुकुंद संगोराम अशी मंडळी ‘माणूस’मधून लिखाण करत.
श्री. ग. माजगावकरांच्या संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा या पुस्तकात घेतला जाणार आहे. ज्यांनी ‘माणूस’मध्ये लिखाण केले अशा साहित्यिकांच्या मदतीने ‘श्रीगमांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करत आहोत.
– निळू दामले, लेखक