* डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आवाहन
* साहित्य संमेलनाचे सूप वाजले
यापुढील काळात साहित्य संमेलनामध्ये धार्मिक प्रतीके वापरली जाऊ नयेत, यासाठी साहित्य महामंडळाने काळजी घेण्याची गरज आहे. तसेच येथील सांस्कृतिक प्रतीकांचाही नीट अभ्यास झाला पाहिजे. त्यातून उद्भवलेला सांस्कृतिक संघर्ष समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी रविवारी त्यांच्या समारोपाच्या भाषणात केले. परशूरामाच्या छायाचित्राच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.
समारोप सोहोळ्यास हजारो रसिकांची असलेली उपस्थिती आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची अनुपस्थिती हे या समारोपाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
साहित्यिकाने भूमिका घेतली पाहिजे, या माझ्या प्रतिपादनाचा विपर्यास करून त्यावर टीका करण्यात आली, असे स्पष्टीकरण देऊन डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, समाजात समतेचा, बंधुतेचा प्रवाह निर्माण होईल, अशा भूमिकेतून साहित्यिकाने लिहिले पाहिजे, असे मला सुचवायचे होते, पण अध्यक्षीय भाषणात वेळेअभावी मला ते नीट मांडता आले नाही, पण सामान्य माणसाचा अक्षरांवरील विश्वास उडेल, असे कोणी लिहू नये, अशी माझी विनंती आहे.
नाना जोशींचे समर्थन आणि आव्हान
या संमेलनात परशुरामाचा विषय समारोपातही गाजला. माजी आमदार निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांनी या कार्यक्रमामध्ये हा वाद केवळ पुन्हा उकरून काढला, एवढेच नव्हे तर त्याचे नि:संदिग्ध समर्थन केले, तसेच त्यासाठी संघर्षांचेही आव्हान दिले, तसेच समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘परशुराम पदस्पर्शे पावन झाली या जगती जय कोकणची धरती’ हे गीत स्थानिक कलाकारांनी सादर केले.
लेखकाने धमकी देणे दु:खदायक
‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी काळे फासण्याची धमकी दिल्याचा त्यांचे नाव न घेता उल्लेख करून डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला धमकी देणे अतिशय दु:खदायक आहे. मी कधी पुढाऱ्यांच्या मागे फिरलो नाही. राजकीय पक्षाच्या आधाराने शिक्षणसंस्था काढल्या नाहीत. एकीकडे स्वत:ला अ‍ॅण्टीएस्टॅब्लिशमेंटवादी म्हणायचे आणि दुसरीकडे पद्मश्री मिळविण्यासाठी खटपट करायची असेही केले नाही, पण मी लवकरच त्यांच्या साताऱ्याला जाणार आहे. त्या वेळी मला अवश्य काळे फासावे. माझी तयारी आहे.
विविध प्रकारच्या सामाजिक प्रवाहांना सामावून घेणाऱ्या शाश्वत मानवी मूल्यांची रुजवात साहित्याद्वारे होण्याची गरज येथे आयोजित ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.गेले तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झाला.