कोकणातील उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या महिला बचतगटांना पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील मंडयांमध्ये गाळे उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच कोकणातील उत्पादने सहजपणे उपलब्ध होणार आहेत.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी कोकण महोत्सवांचे आयोजन केले जाते. या महोत्सवांमध्ये कोकणातील खाद्य पदार्थ, वस्तू इत्यादी विक्रीला ठेवण्यात येतात. परंतु महोत्सव संपल्यानंतर मुंबईत हे  पदार्थ आणि वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे कोकणी उत्पादनांची विक्री करणाऱ्या महिला बचत गटांतील महिलांसाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील मंडयांमध्ये गाळे उपलब्ध करावेत, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी सभागृहात सादर केली होती. ही ठरावाची सूचना शुक्रवारी पालिका सभागृहात चर्चेला आली होती.
गिरगावातील खोताच्या वाडीतील मंडईमध्ये महिला बचतगटांना गाळे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर पूर्व व पश्चिम उपनगरांतही गाळे उपलब्ध करावेत, अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली.
मुंबईमध्ये कोकणवासियांची संख्या अधिक आहे. तसेच कोकणातील पदार्थ आणि अन्य उत्पादने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत. त्यामुळे कोकणातील उत्पादनांची विक्री करणाऱ्या महिला बचतगटांतील महिलांना पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील मंडयांमध्ये गाळे उपलब्ध करून द्यावेत. सर्व बाबींची तपासणी करून याबाबतचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यांमध्ये सभागृहात सादर करावा, असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी प्रशासनाला दिले.
काँग्रेसचा कोकणद्वेष
मुंबईतील नगरसेवकांमध्ये कोकणातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. त्याच्याच जोरावर ही ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली आहे, असा शेरा मारत काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आपले कोकणद्वेष्टेपण जाहीर केले. या ठरावाच्या सूचनेत अंशत: बदल करुन इतर प्रांतातील उत्पादनांनाही संधी द्यावी, असा अग्रह त्यांनी धरला. मात्र सत्ताधारी नगरसेवकांचे आक्रमक रुप पाहून त्यांनी मौन पाळले.