‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’चा पत्ता निराळा सांगण्याची गरजच नाही. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी चौक’ अशी पाटी असलेल्या सर्व ‘बेस्ट’ बसगाडय़ा याच म्युझियमच्या दाराशी थांबत असल्यामुळे, ‘मुखर्जी चौका’चं तिकीट मागितलं तर बऱ्याच बसवाहकांचाही गोंधळ होतो.. कारण सगळे प्रवासी बहुतेकदा ‘म्युझियम’चंच तिकीट मागत असतात, इतकं हे मोक्याचं ठिकाण!

या म्युझियमच्या आत शिरण्याचं तिकीट मात्र ७० रुपये आहे. आत किती वेळ असायचं, यावर बंधन नाही. पण तुम्ही एकटे असा वा सहकुटुंब- तीन तासांच्या वर थांबण्याची तुमचीच तयारी नसते.. थकवा आल्यासारखं होतं वगैरे.. मात्र जो काही वेळ इथं घालवाल, तो नक्कीच कारणी लागेल एवढय़ा कलावस्तू इथं आहेत. त्यांची मांडणीही चांगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जुळणारं त्यांचं चित्रही इथंच आहे. १५ जूनपर्यंत या म्युझियममध्ये गेलात, तर आजकालची चित्रकला आणि जुन्या कृष्णधवल जमान्यातली छायाचित्रकला यांच्याविषयीच्या तुमच्या कलाप्रेमाला अभ्यासाची जोड देता येईल अशी दोन खास प्रदर्शनं इथं सुरू आहेत.

यापैकी पहिलं प्रदर्शन आहे, ‘द जर्नी इज द डेस्टिनेशन’ या नावाचं. झरीना हाश्मी, विवान सुंदरम, नलिनी मलानी, सुधीर पटवर्धन, अतुल दोडिया, अंजू दोडिया आणि बैजू पार्थन या आठ महत्त्वाच्या कलावंतांच्या कलाकृती त्यात आहेत. हे आठही जण गेली किमान ३० र्वष कलाक्षेत्रात आहेत. कलासंग्राहक जहांगीर निकल्सन यांनी २० ते २५ वर्षांपूर्वीच या कलावंतांच्या कलाकृती विकत घेतल्या होत्या, त्या आता याच म्युझियममध्ये ‘जहांगीर निकल्सन आर्ट फाऊंडेशन दालना’च्या संग्रही आहेत. या जुन्या कलाकृतींना याच आठ कलावंतांच्या हल्लीच्या कलाकृतींची जोड देणारं हे प्रदर्शन आहे. ‘तेव्हा आणि आता’ची चित्रं इथं दिसतीलच; पण प्रदर्शनाचा उद्देश आणखी सखोल आहे. या आठही कलावंतांना गेल्या इतक्या वर्षांत स्वत:च्या कामामध्ये काय फरक झालेला जाणवतो, याबद्दल प्रत्येक कलाकाराचं चिंतन अगदी कलाकृतींइतक्याच ठसठशीतपणे प्रदर्शनात मांडलेलं आहे. या प्रदर्शनाबद्दलच्या ३०० (तीनशे) रुपयांच्या अवघ्या ३२ पानी पुस्तिकेत, हे चिंतन अधिक सविस्तरपणे छापलं आहे. पुस्तिका नाही पाहिली तरी, प्रदर्शन पाहताना अनेक गोष्टी लक्षात येतील.. अतुल दोडियांच्या चित्रांमधून मनुष्याकृती आणि ‘फोटोरिअ‍ॅलिझम’ कमी होऊन, आपण ज्यांना पाहूनही न पाहिल्यासारखं करतो असे आकार आणि सांस्कृतिक चिन्हं (ते चित्र इथं नाही, पण सांडपाण्याचा पाइपसुद्धा ‘चिन्ह’च) दोडियांच्या नंतरच्या चित्रांमध्ये येत गेले. सुनील गावडे यांनी ‘अमूर्तचित्रा’ची चौकट सोडून अमूर्त भावभावनांचा थेट मांडणशिल्पांचं दृश्यरूप दिलं (सोबतच्या छायाचित्रात मधोमध दिसतो आहे, तो गुलाबपुष्पं पसरलेला जिना गावडे यांचाच), सुधीर पटवर्धनांनी केवळ सभोवतालची माणसं आणि समाज यांचं चित्रण करता-करता कालांतराने, कलेतिहासाच्या अनेक टप्प्यांना आपल्या चित्रामध्ये अंगभूत करण्याचे प्रयोगही वाढवत नेले. अंजू दोडिया स्वत:बद्दल इतरांमधून बोलायच्या, फार सूचक असायच्या.. त्या स्पष्ट आणि धीट झाल्या, तेही सूचकपणामधली कलादृष्टी अजिबात न सोडता! झरीना हाश्मी यांनी सूचकपणाकडे अधिक प्रवास केला. बैजू, मलानी आणि विवान सुंदरम यांनी नवनवीन तंत्रं आणि नवा आशय, नवे प्रश्न यांवर भर दिला. यापैकी मलानींचं काम खूप बदलल्यासारखं इथं दिसणार नाही. पण बैजू पार्थन यांच्या कामातला फरक अगदी कुणालाही कळेल. विवान सुंदरम हेही जलरंग चित्रांकडून व्हिडीओ आर्ट, मांडणशिल्पं यांकडे वळले. पण इथं त्यांची जी अलीकडली कलाकृती आहे, ती कलावंत-कार्यकर्ता यांचं अद्वैत दाखवणारी आहे.

या आठही कलावंतांची चित्रं कुणी प्रथमच पाहात असेल, तरी थेट या कलावंतांच्या ‘आत डोकावण्या’ची संधी देणारं असं हे प्रदर्शन आहे!

या ‘जहांगीर निकल्सन दालना’तून एक जिना खाली उतरलात की लगेच, ‘क्युरेटर्स गॅलरी’ लागते. तिथं, १९४०च्या दशकात ली गौतमी यांनी तिबेटच्या टिपलेल्या फोटोंचं प्रदर्शन सुरू आहे. सोबत ली गौतमी यांची माहिती देणारा फलकही वाचनीयच आहे. मूळच्या रति पेटिट या परदेशात फोटोग्राफी शिकलेल्या पारसी महिलेनं पुढे भारतात येऊन, १९३४ साली गुरुदेव रवीन्द्रनाथांच्या शांतिनिकेतनात तत्त्वज्ञान शिकण्यासाठी प्रवेश घेतला, शांतिनिकेतनातच ‘लामा अंगारिका’ हे मूळचे जर्मन प्राध्यापक भेटले, त्यांच्याशी विवाह झाला आणि १९४७ साली रती यांनी बौद्ध धर्म स्वीकारून, ‘ली गौतमी’ हे नाव घेतलं. या दोघांनी तिबेटच्या त्सपरांग, ग्यान्त्से या मोठय़ा मठांपर्यंतचा खडतर प्रवास केला. सहा मजली ग्यान्त्से ‘कुमबुम’ (मठ), सौगाँग येथे बुद्धाची खडकावर कोरलेली (बामियानची आठवण देणारी) बुद्धशिल्पं, शिप्की-ला किंवा झंदल-फूक अशा दुर्गमातिदुर्गम गावांमधले आनंदी लोक आणि अगदी एक तिबेटी डाकूसुद्धा अशी चिनी अतिक्रमण-पूर्व तिबेटची संस्कृती जपून ठेवणारी ही छायाचित्रं १९४७ आणि ४८ सालातली आहेत. माणसं, निसर्गदृश्यं आणि धर्मदृश्यं अशा तीन भागांखेरीज या प्रदर्शनात एका भिंतीवर, ली गौतमी यांनी तिबेटी चित्रांबरहुकूम केलेली रेखाटनंही आहेत. मधोमध काचेच्या चौकोनात गौतमी आणि लामा अंगारिका यांचे फोटो, काही वस्तू.. आणि गौतमी यांनी वापरलेल्या ‘कोडॅक बॉक्स कॅमेऱ्या’चे अवशेष, असंही ठेवलं आहे. हे प्रदर्शन तिबेटच्या इतिहासात डोकावण्याची संधी देणारं आहे.

याखेरीज, ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त परमेश्वर चव्हाण, आनंद मोरे, हर्षद खंदारे आणि स्वप्निल रगडे यांचं समूहप्रदर्शन; तसंच शरद मालणकर यांची शिल्पं, प्रभाकर कांबळे यांची चित्रं अशी प्रदर्शनं आहेत. समोरच राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) आलमेलकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं प्रदर्शन ३० जूनपर्यंत सुरू आहे. ‘क्लार्क हाऊस’ किंवा ‘तर्क’ या गॅलऱ्याही इथून जवळच आहेत.