कुलाब्याला रीगल थिएटरसमोरच असलेल्या आमदार निवासात ‘सहकारी भांडार उपाहारगृह’ आहे.. ‘चिकिता’ किंवा ‘वूडसाइड इन’ अशी विदेशीच पदार्थ देणारी रेस्तराँ अगदी समोरच असताना हे ‘सहकारी भांडार उपाहारगृह’ अधिक आपलं वाटतं.. तर याच्या समोरची ‘क्लार्क हाऊस बिल्डिंग’ गाठलीत आणि जुन्या घरांची दारं असायचं तशा पांढऱ्या दाराची बेल दाबून आत गेलात की, ‘क्लार्क हाऊस’ याच नावाचं एक निराळं आणि अधिक आपलं वाटणारं कलादालन तुमच्यासमोर असेल! अन्य झकपक, श्रीमंती कलादालनांपुढे याचं निराळेपण लक्षातही राहील. इथंच सध्या सुचेता घाडगे, रंजीता कुमारी, शरनवाज आणि मारिआ-मारिका कोनिग या चौघींच्या कलाकृतींचा समावेश असलेलं ‘रिव्हर विथ अ थाऊजंड होल्स’ या शीर्षकाचं प्रदर्शन सुरू आहे. पर्यावरण आणि स्त्री, ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना.

जागेचा वापर, माणसांनीच स्वत:च्या व्यावहारिक जगण्यासाठी एकमेकांमध्ये तयार केलेल्या भिंती किंवा फाळण्या (पार्टिशनं), माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही आक्रसत जागा, नद्यांचे आक्रसणारे किंवा लुप्तच होणारे प्रवाह यांच्याबद्दलची ड्रॉइंगवजा चित्रं सुचेता घाडगेनं केली आहेत. सुचेता मूळच्या

साताऱ्याच्या. त्याहीमुळे असेल, पण ‘प्लॉट पाडण्या’चा जो धंदा महाराष्ट्रभर जोशात चालतो आहे, त्याचंही प्रतिबिंब त्यांच्या एका चित्रात आहे. जगण्याचा अवकाश -म्हणजे जागा आणि मोकळीक- मर्यादित होत गेल्याची रुखरुख सुचेता घाडगे यांच्या अन्य चित्रांमधूनही दिसून येते.

रंजीता कुमारी यांच्या कलाकृतींमध्ये रंगचित्र, शिल्प, मांडणशिल्प, व्हिडीओकला असं वैविध्य आहे. पुस्तकाच्या आकाराच्या टेराकोटा-शिल्पाला भोकं पाडून, त्यातून उगवणाऱ्या आणि मरून जाणाऱ्या मोहरीच्या रोपांचं चित्रण व्हिडीओमध्ये आहे. बाजरीच्या बियाण्याऐवजी आता जमिनीत सिमेंटच पेरलं जातं, हे वास्तव थेट तुमच्या डोळ्यासमोर मांडणाऱ्या बियाणं आणि सिमेंट यांपासून बनवलेल्या विटाही इथं आहेत. मात्र खूप वेळ देऊन समजून घ्यावं, असं रंजीता यांचं काम म्हणजे ‘चुंबळ’ एकमेकींवर ठेवून बनलेलं, जणू गगनचुंबी इमारतींची आठवण देणारं एक मांडणशिल्प आणि त्यात दडलेल्या ध्वनिवर्धकातून आपल्या कानांपर्यंत पोहोचणारे, चुंबळ डोईवर ठेवून या इमारती बांधणाऱ्या मजुरांचे आवाज! ही कलाकृती बघण्याची तसंच ऐकण्याचीही आहे. मात्र तिला ‘साऊंड आर्ट’ म्हणता येणार नाही. साऊंड आर्ट किंवा ध्वनिकलेत प्रामुख्यानं आवाजाची अमूर्त बाजू हाताळलेली असते, त्याउलट इथं मात्र थेट शब्दांना आणि त्यांच्या अर्थाना महत्त्व आहे. त्यामुळे ‘ध्वनिदस्तऐवज’ (साऊंड डॉक्युमेंटेशन) हे या कामाचं स्वरूप आहे. रंजीता दिल्लीनजीक शिकल्या. नोएडा, गुडगांव आदी भागांतले बांधकाम-मजूर हे खरं तर विस्थापित शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यापैकी अनेकांशी बोलून, मुलाखती घेऊन रंजीता यांनी या कामाचा विचार सुरू केला. या मांडणशिल्पातल्या सर्वच्या सर्व चुंबळ वापरलेल्या आहेत, हा या कलाकृतीचा ‘दृश्य’भाग! असं कसं झालं? त्या मजुरांनी स्वत:च्या कामाच्या चुंबळ डोक्यावरून काढून एका चित्रकर्तीला देऊन टाकल्या त्या कशा काय? ‘‘मी चुंबळ बांधायला शिकले- मजुरांकडे नव्या चुंबळ मी घेऊन जायचे आणि ‘हे नवं असल्यानं जास्त आराम वाटेल’ असं सांगायचे. मग जुनी चुंबळ जमा करायचे’’ असं रंजीता यांचं उत्तर!

मारिआ आणि शरनवाझ यांची कामं निसर्ग, स्त्री, मत्स्यधन यांवर आधारित आहेत. ती चित्रं काहीशी कवितेसारखी तरल आणि भावनिकसुद्धा आहेत. पण चौघींचीही चित्रं पाहून ‘कुठे आणि कसं जगायचं,’ असा प्रश्न त्यांनी एकत्रितपणे मांडल्याची खात्री पटते. त्याबद्दल झाशा कोला यांनी लिहिलेला प्रस्तावनालेख प्रदर्शनाच्या जागी बसून किंवा घरी नेऊन वाचता येईलच.