|| सौरभ कुलश्रेष्ठ

३० जानेवारीपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात पदयात्रा

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदाररूपी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा यासाठी राज्यभरातील भाजप नेते, आमदार, खासदार २ ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंतीपासून ते ३० जानेवारी २०१९ पर्यंत म्हणजेच गांधी पुण्यतिथीपर्यंत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात टप्प्याटप्प्याने १५० किलोमीटरची वारी काढणार आहेत. महात्मा गांधी सेवा स्वच्छता-संवाद पदयात्रा असे त्याचे नाव असून पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर चालत-चालत गांधीजींना प्रिय असणारी भजने म्हणत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, नेते हे १५० कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी स्वच्छताही करणार आहेत.

स्वच्छ भारत योजनेच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा गांधीजींना आपलेसे केले. आता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधत भाजपने २ ऑक्टोबर २०१८ ते ३० जानेवारी २०१९ या ४ महिन्यांच्या काळात गांधीनामाचा जप करत पदयात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याची योजना आखली आहे. गांधीजी हे राष्ट्रपिता आहेत. कॉंग्रेसची खासगी मालमत्ता नाही, अशी भाजपची भूमिका आहे.

२ ऑक्टोबर ते ३० जानेवारी या काळात दर आठवडय़ात एक दिवस अशारितीने टप्प्याटप्प्याने एकूण १५ दिवस महात्मा गांधी सेवा स्वच्छता-संवाद पदयात्रा होईल. त्यात सकाळी ५ किलोमीटर व सायंकाळी ५ किलोमीटर अशारितीने १० किलोमीटर पदयात्रा निघेल. सकाळी रोज एक तास त्या मार्गातील काही ठिकाणांची स्वच्छता करण्यात येईल. स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्षांसह १५० पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होतील. ज्या मतदारसंघात आमचे आमदार नाहीत तेथे विधान परिषदेतील आमदार, राज्यसभा खासदार, मतदारसंघाचे प्रभारी यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात ही पदयात्रा सुरू होईल. पंढरपूरच्या वारीच्या संकल्पनेवर ती आधारित आहे. गांधीजींना प्रिय असणारी भजने म्हणत पदयात्रा पार पडेल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व या पदयात्रेचे संयोजन करणारे आमदार सुरेश हळवणकर यांनी दिली.

  • लोकसभा मतदारसंघात सुमारे १८०० बूथ असतात. भाजपची ही वारी त्यापैकी ९०० बूथ क्षेत्रातून जाईल.
  • मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ भारत यासारखे उपक्रम राबवून स्वदेशीचे गांधीजींचे धोरण भाजपच कसे खऱ्या अर्थाने राबवत आहे, याचा संदेशही या वारीवेळी त्या भागातील मतदारांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.