अन्न व औषध प्रशासनाची मोहीम; पदाधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाची गुणवत्ता चांगली असावी, निकृष्ट दर्जाच्या प्रसादामुळे भाविकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंदाच्या गणेशोत्सवात थेट सार्वजनिक गणेश मंडळांमध्येच जनजागृती करण्याचे ठरविले आहे. प्रसादाचा दर्जा राखला जावा यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून एफडीएचे अधिकारी विशेष प्रशिक्षण देत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत मुंबईतील ७० हून अधिक मंडळांना हे प्रशिक्षण दिले आहे. यावेळी मंडळांना प्रसाद तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रशिक्षण दिले गेले. त्याबरोबर प्रसाद तयार करणाऱ्याने हातमोजे व टोपी वापरावी व प्रसाद तयार करणारा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश देण्यात आले. परवानाधारक दुकानदारांकडूनच वस्तूंची खरेदी करण्याचे आदेशही यावेळी गणपती मंडळांना देण्यात आले. भाविकांना दिल्या जाणाऱ्या मिठाईवरील चांदीच्या वर्खाची गुणवत्ता चांगली नसल्याचे काही वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार एफडीएने कारवाईही केली होती. मात्र सणासुदीच्या दिवसात मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या खवा, रवा, दूध, बेसन, खाद्यतेल यामध्ये भेसळ होत असल्याने यंदा एफडीएने गणपती मंडळ व दुकानदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.

गणेशोत्सवादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठय़ा प्रमाणात प्रसाद तयार करताना अनेकदा स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गणेश मंडळांच्या विश्वस्तांना व गणेश मंडळांशेजारील दुकानदारांना बोलावून प्रशिक्षण देण्यात आले, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

मिठाईऐवजी सुकामेवा

प्रसादाच्या दर्जाबाबत मंडळेही जागरूक झाली आहेत. गणेश मंडळे अनेकदा प्रसादाकरिता बाहेरून मिठाई खरेदी करतात. त्यात भाविकही गणपतीला मिठाईचा नैवेद्य घेऊन येत असतात. मात्र मिठाई फार दिवस टिकत नसल्याने त्याच दिवशी किंवा ४८ तासात संपवणे गरजेचे असते. मात्र ‘चिंचपोकळी गणेश मंडळा’कडून यंदा मिठाईऐवजी प्रसाद म्हणून सुका मेवा देण्यात येणार आहे, असे चिंचपोकळी गणेश मंडळाचे संदीप परब यांनी सांगितले. ‘ताडदेवच्या राजा’ या गणेश मंडळांनीही यंदा प्रसाद हा कापडी पिशवीतून वाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय खास आचारी बोलावून मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या घरातच प्रसाद तयार केला जाणार आहे, असे ‘ताडदेवचा राजा’ या मंडळाचे उपखजिनदार जीतेंद्र घाडी यांनी सांगितले. सिद्धिविनायक मंदिराजवळ पेढय़ांचे दुकान चालविणारे नितिन सुर्वे यांनी एफडीएने दिलेल्या प्रशिक्षणात हजेरी लावली होती.