26 January 2020

News Flash

गणेश आगमन मिरवणुकीतील बेशिस्त आवरा!

गणेशमूर्ती आगमन मिरवणूक शांततेत व कमी गर्दीत घेऊन येण्याच्या सूचनाही समितीने केल्या आहेत.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आगमनाच्या मिरवणुकीत झालेल्या हुल्लडबाजीनंतर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बेशिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून अशा मिरवणुकांमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताण पाहता, मंडळांनी स्वत:च बेशिस्तीला आवर घालण्याची गरज असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. तसेच गणेशमूर्ती आगमन मिरवणूक शांततेत व कमी गर्दीत घेऊन येण्याच्या सूचनाही समितीने केल्या आहेत.

गणेशोत्सव तोंडावर आला की शहरातील सार्वजनिक मंडळे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी गणेश कार्यशाळेतून गणेशमूर्ती मंडपस्थळी घेऊन येतात. पूर्वीही हीच पद्धत होती. मात्र अलीकडे गणेशमूर्ती मंडपस्थळी आणताना मिरवणूक काढली जाते. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीतही हाच प्रकार दिसून आला. यावर समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘सध्या काश्मीर प्रश्न ज्वलंत आहे. पोलिसांना सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. त्यात शहरात सर्वत्र मेट्रो किंवा अन्य विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. मुंबई हे दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. येथील कोणत्याही निमित्ताने जमणारी गर्दी घातपातासाठी प्रमुख आकर्षण ठरते. या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण होता सुरळीत पार पडावा हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. त्यासाठी पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द होतात. असे असताना त्यांना आपणहून सहकार्य करावे की बेशिस्तपणे वागून त्यांच्यावर आणखी ताण टाकावा, हा विचार प्रत्येक मंडळाने, प्रत्येक गणसेवकाने करणे अपेक्षित आहे,’ असे ते म्हणाले.

 पोलिसांचे कानावर हात

या प्रकारात काळाचौकी पोलिसांनी गर्दीचा अंदाज घेऊन ती पांगवण्यासाठी दुपारपासून प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र त्याऐवजी पोलीस गर्दीला आवरू लागले. मंडळालाही गर्दीला आवाहन करणे शक्य होते. मात्र तसे काही घडले नाही. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी तर रेटारेटी, चेंगराचेंगरी, घुसमट घडलीच नाही असा दावा केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती नियंत्रणात होती, असे ते म्हणाले. अपेक्षित गर्दीचा अंदाज चुकला का, जास्तीत जास्त गर्दी गोळा करण्याचा पायंडा पडेला का, या प्रश्नांना मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.

गणसेवकांना पोलीस प्रशिक्षण

गेल्या महिन्यात पोलीस, समन्वय समितीत घडलेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्ते, गणसेवकांना पोलीस प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी पुढे आली. त्यानुसार १६ ऑगस्टपासून हे प्रशिक्षण सुरू होईल, असे समितीचे अध्यक्ष दहिबांवकर यांनी सांगितले. या प्रशिक्षणात गर्दीवरील नियंत्रण, नियोजन, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घ्यायच्या उपाययोजना, संशयास्पद वस्तू-व्यक्तीबाबत करावयाची कृती याचा समावेश असेल.

समाजमाध्यमांवरून गर्दीसाठी आवाहन?

मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी रविवारच्या मिरवणुकीत सव्वा लाख भाविकांची गर्दी होती, असे लोकसत्ताला सांगितले. मात्र आमंत्रण कोणालाही दिले नव्हते. हा शक्तिप्रदर्शनाचा किंवा अन्य मंडळांशी स्पध्रेचा प्रयत्न नव्हता, असा दावा नाईक यांनी केला. प्रत्यक्षात जास्तीत जास्त गर्दी कशी गोळा होईल, यासाठी समाजमाध्यमांवरून पद्धतशीरपणे प्रयत्न केल्याचे मंडळाच्या फेसबुक पेजवरील आवाहन पाहता स्पष्ट होते.

‘गेल्याच वर्षी आगमन मिरवणुकीची प्रथा बंद करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र यंदा शतकमहोत्सवी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांचा तसा आग्रह होता. मात्र पुढल्या वर्षी मंडपातच मूर्ती तयार करण्याचा विचार मंडळात सुरू आहे.’     – उमेश नाईक, अध्यक्ष, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

 

First Published on August 14, 2019 12:32 am

Web Title: ganesh chaturthi 2019 mpg 94
Next Stories
1 गणेश भक्तांसाठी स्पेशल अल्बम ‘बाप्पा मोरया’
2 Video : ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चे जल्लोषात आगमन
3 संयुक्त पाहणीनंतरच गणेशमूर्तीचा मार्ग निश्चित
Just Now!
X