गणेशोत्सव मंडळांना वाहतूक पोलिसांच्या सूचना; मेट्रो प्रकल्पासाठी विशेष उपाययोजना

शहरातील चार धोकादायक उड्डाणपुलांबाबत(रेल्वे रूळांवरील) वाहतूक पोलिसांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यात भायखळा, चिंचपोकळी, करी रोड आणि जुहूतारा उड्डाणपुलांचा समावेश आहे. एकाचवेळी १६ टनांपेक्षा जास्त रहदारी झाल्यास हे पुल कोसळण्याची भीती आहे.  विसर्जन मिरवणुकांसाठी या पुलांचा वापर करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही बाब लक्षात घ्यावी. अपघात घडला तर संबंधीत मंडळांना जबाबदार धरले जाईल, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

धोकादायक पुलांसह शहरात सर्वत्र सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे अरुंद झालेले रस्ते, विसर्जन स्थळे आणि विसर्जन मिरवणुकांचे मार्ग लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केली आहे. दक्षिण मुंबईतील डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील नवजीवन चौक ते ग्रॅण्ट रोड स्थानक चौकापर्यंतचा रस्ता गणेशमुर्ती विसर्जित करण्यासाठी चौपाटीकडे जाणारी वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल.

मलबारहिल वाहतूक विभागांतर्गत मेट्रो-३ प्रकल्पाचे काम मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याने नवजीवन चौकातून डावे वळण घेऊन रुसी मेहता चौक, बाळाराम स्ट्रीट, बाटा चौकातून उजवे वळण घेऊन मौलाना शौकतअली मार्ग, ग्रॅण्ट रोड चौकातून डावे वळण घेऊन पुन्हा डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरून एन. पॉवेल किंवा गजानन वर्तक चौक, तेथून उजवे वळण घेऊन एस. व्ही. पी मार्गावरून ऑपेरा हाऊसमार्गे विसर्जन मिरवणुका गिरगाव चौपाटीवर येतील. या मार्गात मिरवणुकांमुळे कोंडी झाल्यास अयोध्या हॉटेलजवळून डावे वळण घेऊन व्ही. पी. मार्गाने केळकर चौकी, तेथून उजवीकडे यु टर्न घेऊन एस. व्ही. पी मार्ग, गजानन वर्तक चौक, ऑपेरा हाऊस मार्गे गिरगाव चौपाटीवर यावे, असे वाहतूक पोलिसांनी सुचवले आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावर आयआयटीचे मुख्य प्रवेशद्वार, एनटीपीसी आणि पवई घाट येथे मोठय़ा प्रमाणावर विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी पवई तलावावरील गणेश घाट येथे गणेशमुर्ती घेऊन येणारे ट्रक, ट्रेलरना बंदी घातली आहे. छोटे टेम्पो, चारचाकी खासगी वाहने किंवा रिक्षा मात्र घाटापर्यंत येऊ शकतील. तसेच या भागात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यासही बंदी आहे.

सात मार्गावर वाहतूक बंदी

गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल.रोज दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात या काळात हा मार्गावर  वाहतूक होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्गावर उजवीकडे जाणारी, चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी चौकातून उजवीकडे जाणारी, चिंचपोकळी पुलावरून साने गुरुजी मार्गाकडे येणारी, एसएस राव मार्गावरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंतची आणि दत्ताराम लाड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हॉटेल रिजॉईस चौक ते श्रावण यशवंते चौकापर्यंतची(दुतर्फा) वाहतूक बंद राहील.