दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील बाजार आणि रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. एका बाजूला मोठय़ा रस्त्यांवरून सार्वजनिक गणपतींचे आगमन होत असताना दुसऱ्या बाजूला गल्लोगल्लीच्या बाजारांत घरगुती गणपतींसाठी खरेदीची लगबग सुरू आहे. गणेशाच्या आगमनापूर्वी आलेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा गणेशभक्त करून घेत आहेत.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मुंबईतील लालबाग आणि दादर ही मोक्याची ठिकाणे आहेत. गौरी-गणपतीसाठी अलंकार, पूजेचे साहित्य, प्रसाद, सजावट अशा सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने दोन्ही बाजारांत भाविक एकवटले आहेत. दुपारी जेवणाची वेळ सोडल्यास इतर वेळी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या वेळी संपूर्ण गुळाचा मोदक बाजारात नव्याने दाखल झाला आहे. १० रुपये प्रतिमोदक अशी किंमत असल्याने तो सर्वाना परवडणाराही आहे. यंदा काजूमोदकांची विक्री वाढली आहे. दिवसातून २०० पेक्षा अधिक पाकिटे संपल्याचे लालबाग बाजारातील ‘जी. डब्ल्यू. खामकर’ दुकानाच्या मालकांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही मखरांची विक्री यंदा वाढली आहे. यात कापडी मखर ट्रेनच्या गर्दीतूनही सहज घेऊन जाता येत असल्याने आणि अगदी १५०० ते १६०० रुपयांत उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच कापडी झुंबर ५०० ते ६०० रुपयांना उपलब्ध आहेत. गणपतीच्या मागे लावण्यासाठी रंगीत, नक्षीदार कापड, मंडपाला लावण्यासाठी सुपारी, सीताफळ, इत्यादी साहित्याची खरेदीही ऐन वेळी सुरू आहे. नवनवीन आरत्या असणारी पुस्तके घेण्याकडे भक्तांचा कल दिसून येतो.

कापसाच्या तयार वाती, कापूर, अगरबत्त्या, धूप असे पूजा साहित्य पुढील पाच दिवसांचा विचार करून एकत्रित खरेदी केले जात आहे. गौरीसाठी अंबाडा, हिरव्या बांगडय़ा आणि इतर अलंकार यांची खरेदी महिलावर्ग गणपतीच्या खरेदीबरोबरच उरकत आहे. खरेदी पूर्ण झाल्यावर शेवटी ग्राहक पोटपूजा करत असल्याने लहान-मोठे खाद्यविक्रेते यांच्यापासून ते अगदी रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र गर्दी आढळत आहे. सर्व धामधुमीत उत्सवाला गालबोट लावणारी एखादी घटना घडू नये म्हणून पोलीसही दक्ष असल्याचे आढळून येते. आता पुढचे दोन दिवस तरी बाजारात हीच स्थिती पाहायला मिळणार आहे.