गणेशोत्सवासाठी ठाण्यातून प्रथमच विक्रमी विशेष गाडय़ा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषीकेश मुळे, शलाका सरफरे, ठाणे</strong>

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा ‘फुल’ झाल्याने आणि खासगी गाडय़ा भरमसाठ महागल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी यंदा राज्य महामंडळाच्या विशेष बसगाडय़ांची कास धरली आहे.

या मार्गावरील रस्त्यांच्या दुर्दशेच्या बातम्या कानावर असूनही अनेकांनी रेल्वेऐवजी ‘लालपरी’तून प्रवास करण्यास पसंती दर्शवली आहे. यंदा एकटय़ा ठाणे परिसरातून कोकणातील विविध मार्गावर जाण्यासाठी तब्बल ३१२ विशेष एसटी गाडय़ा सोडण्यात आल्या असून त्या सगळ्या पूर्णपणे भरून गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांतला ठाणे विभागातला हा उत्तम प्रतिसाद आहे, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे आरक्षण साधारणपणे तीन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. तसेच अनेक विशेष रेल्वे गाडय़ांचे आरक्षणही चढे दर असूनही संपले आहे. काही विशेष गाडय़ांची परतीच्या प्रवासातील तिकिटे मात्र उपलब्ध आहेत.

कोकणात जाताना रस्त्यांची होणारी दुर्दशा आणि वाहनकोंडी यामुळे अनेक गणेशभक्त रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे तिकिटांचे चढे दर असूनही वातानुकूलित डबेही आरक्षित होतात. कोकणात एसटीने जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही मोठी असली, तरी  रेल्वे प्रवासाकडे अनेकांचा कल दिसून येतो. त्यामुळे ठाण्यासारख्या शहरातून कोकणात जाणाऱ्या विशेष बसगाडय़ांचा आकडा दरवर्षी थोडा कमीच असतो. यंदा मात्र चित्र पूर्ण बदलले आहे.

गेल्या वर्षी २००च्या आसपास एसटी गाडय़ा सोडल्या होत्या. यंदा ही संख्या विक्रमी आहे, असे ठाणे सीबीएस येथील सहाय्यक वाहतूक अधीक्षक रमेश यादव यांनी सांगितले.

कोकण आणि मध्य रेल्वेतर्फे यंदाच्या वर्षी १३२ जादा फे ऱ्या चालविल्या जात आहेत. नेहमीपेक्षा तिकीट दर महाग असूनही या विशेष रेल्वे गाडय़ांची आरक्षण क्षमता पूर्ण झाली आहे. तसेच या प्रत्येक विशेष गाडीमागे ३०० ते ४०० प्रवासी प्रतीक्षा यादीत अद्याप ताटकळत आहेत.

गणेशोत्सवात स्पेशल गाडय़ांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक पूर्ण बंद करण्यात येते. यंदा भक्तांच्या सोयीसाठी गाडय़ांना अतिरिक्त डबेही जोडण्यात आले आहेत, असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले.

९० गाडय़ांची भर ’यंदा ठाणे परिसरातून एकूण ३१२ विशेष एसटी बसगाडय़ा कोकणाच्या दिशेने नऊ सप्टेंबरपासून सोडण्यात येत आहेत. यात सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी ७०, रायगडसाठी ३०, रत्नागिरीसाठी २१६ गाडय़ा आहेत.

’ या गाडय़ा लोकमान्यनगर, वर्तकनगर जंक्शन या भागांतून कोकणात जाण्यासाठी मार्गस्थ होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. कॅडबरी जंक्शन येथे या गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे.

पुणे-साताऱ्यासाठीही गाडय़ा : पुणे, सांगली, सातारा, फलटण या भागांत जाण्यासाठीही सहा विशेष गाडय़ा ठाण्यातून सोडल्या जाणार आहेत. या गाडय़ा १३ सप्टेंबरला सोडण्यात येतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh devotees prefer st buses for going konkan
First published on: 12-09-2018 at 04:06 IST