‘कशासाठी पोटासाठी’ हे साऱ्या शहरी धावपळीचे सार असले तरी त्या उदरभरणाची नीट व्यवस्था करता येईल, इतकाही वेळ अनेकांकडे नसतो. त्यामुळे मग सहज जाता-येता वाटेतले एखादे फूड कॉर्नर गाठून भूक शमवली जाते. अशा कॉर्नरवर उभे राहून उभ्या उभ्याच आपापल्या आवडी-निवडीनुसार इडली, डोसा, मेदुवडा खाल्ला जातो. त्यामुळे अशा कॉर्नर्सभोवती सकाळ-संध्याकाळी खवय्यांची गर्दी दिसते. उत्तम चवीची जाहिरात करावी लागत नाही. खवय्ये एकमेकांना अशा ठिकाणांची शिफारस करीत असतात. ठाणे पश्चिम विभागात रेल्वे स्थानकालगत असणारे गणेश डोसा सेंटर अशा कॉर्नरपैकी एक आहे.

अगदी स्थानकालगत असल्याने सकाळ-संध्याकाळ येथे खवय्यांची रीघ लागलेली असते. गरमागरम डोसा, इडली सांबर, मेदुवडा सांबर आदी पदार्थ येथे मिळतात. बारीक रवा, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून डोशाचे पीठ घरच्याघरी तयार केले जाते. या कॉर्नरवर दिवसाला ८०-९० किलो पीठ अगदी सहज संपते. लुसलुशीत इडली आणि उत्तप्पा आणि कुरकुरीत डोसा येथे खायला मिळतो. त्यामध्ये मसाला उत्तपा, बटर मसाला उत्तपा, म्हैसूर मसाला उत्तपा, चीज म्हैसूर उत्तप्पा, बटर म्हैसूर मसाला उत्तप्पा, चीज म्हैसूर मसाला उत्तपा, शेझवान उत्तप्पा असे उत्तप्पाचे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. येथील टॉमेटो उत्तप्पाला विशेष मागणी आहे. खवय्ये आवडीने हा उत्तप्पा खातात. उत्तप्प्यावर टॉमेटो बारीक चिरून टाकला जातो. चवीपुरता थोडासा टोमॅटो सॉसही टाकला जातो. त्यामुळे या पदार्थाला एक लाजवाब चव येते. खास दाक्षिणात्य मसाले वापरून तयार करण्यात येणारा येथील म्हैसूर मसाला उत्तपाही भन्नाट चवीचा आहे. बीट, बटाटे, गाजर आदी पदार्थ एकजीव करून त्याचे सारण यात वापरले जाते. दरदिवशी साधारण दहा किलो बटाटे वापरले जातात. रवा साधा डोसा, रवा मसाला, रवा ओनियन, रवा ओनियन मसाला, रवा म्हैसूर मसाला या डोशांनाही मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. येथे दर दिवशी ४०० ते ५०० मसाला डोसा अगदी सहज संपतात, असे दुकनाचे मालक गणेश नाडार आणि रामन यांनी सांगितले. चीज ओनियन मसाला डोसा, म्हैसूर साधा डोसा, बटर म्हैसूर सादा डोसा, चीज म्हैसूर साधा डोसा, शेझवान सादा डोसा आदी डोश्यांना अधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येथे गरमागरम मेदुवडा सांबर खाण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. १००-२०० मेदुवडा प्लेट येथे सहज संपतात. दुकान अतिशय छोटे असल्याने येथे उभ्यानेच खावे लागते. डीश ठेवायला कडाप्प्याची लादी टाकण्यात आली आहे. मात्र गर्दीच्या वेळी ती अपुरी पडते. मग हातात ताट घेऊन लोक चक्क बाहेर उभे राहून खातात. आता थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे गरमागरम पदार्थावर खवय्ये अधिक ताव मरताना दिसून येत आहेत. सांबार बनवताना कांदा, टोमॅटो, राई, लसूण, तुरडाळ आदी पदार्थाचा वापर केला जातो. इथे बनविले जाणारे सांबार खूप चविष्ट असते. त्यामुळे एक प्लेट डोसा किंवा उत्तपा घेतला तर दोन मोठय़ा वाटय़ा सांबार खवय्ये मागून घेतात. सांबार नसेल तर आमच्या पदार्थाची खासियतच काय असा सवाल रामन करतात.

सांबार आणि त्यासोबत दिली जाणारी ओल्या नारळाची चटणी याशिवाय दाक्षिणात्य पदार्थ पूर्ण होऊच शकत नाही. चटणी आणि सांबाराच्या वाटीने सजलेले ताट पोटपूजा करण्याआधी मस्त पाहत राहावेसे वाटते. येथील डोसे हे पातळ आणि कुरकरीत असतात. दाक्षिणात्य पदार्थाची हीच खासियत असल्याचे गणेश नाडर यांनी सांगितले. ठाणे स्थानक परिसरात भुकेल्या पोटी असाल तर गणेश डोसा सेंटरची पायरी चढायला हरकत नाही.

कुठे-गणेश डोसा, ठाणे रेल्वे स्थानक, ठाणे (प.)

कधी- सकाळी ८.३० ते रात्री १०