मंडप उभारणीसाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील तमाम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालत आहेत. तर पालिकेने अद्याप ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिका’च प्रकाशित न केल्यामुळे मंडप उभारणीबाबत परवानगी देणारे अधिकारी नियमावलीबाबत अनभिज्ञ आहेत. परिणामी, वरिष्ठांकडून अद्यापही कोणत्याच सूनचा न मिळाल्याने परवानगी देता येणार नाही, असे उत्तर देऊन पालिका अधिकारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पिटाळून लावत आहेत. गणेशोत्सव जवळ येत असल्याने मंडपाअभावी उत्सवाची तयारी कशी करायची असा प्रश्न सरसकट सर्वच मंडळांना पडला आहे.दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पालिकेकडून ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिका’ प्रकाशित केली जाते. गणेशोत्सवात पाळावयाचे नियम, परवानगीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि अन्य माहितीचा या पुस्तिकेमध्ये समावेश असतो. तसेच मंडप उभारणीसाठी आवश्यक असलेला अर्जही या पुस्तिकेद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून दिला जातो.मंडळाची सर्व माहिती नमुद केलेल्या या अर्जावर पालिकेकडून शिक्का मिळवावा लागतो. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांना हा अर्ज सादर करून वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडून मंडप उभारणीसाठी परवानगी घ्यावी लगाते. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या परवानगीसह ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिके’तील अर्ज पुन्हा महापालिकेकडे सादर करावा लागतो. त्यानंतर शुल्क आकारुन गणेशोत्सव मंडळाला मंडप उभारणीसाठी महापालिकेकडून परवानगी दिली जाते.मंडपाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे केवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच, नव्हे तर दस्तुरखूद्द पालिका प्रशासनही संभ्रमात आहे. मंडप उभारणीबाबतचे धोरण विचारात घेऊन यंदा ही पुस्तिका तयार करावी लागणार आहे. तसेच त्यात आवश्यक ते बदलही करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेने यंदा अद्यापही ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिका’ प्रकाशित केलेली नाही. त्यामुळे मंडळांना मंडपाच्या परवानगीचा अर्ज मिळू शकलेला नाही. परिणामी, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी साध्या कागदावर मंडप परवानगीसाठी अर्ज करून, त्यास गेल्या वर्षीच्या परवानगीची कागदपत्रे जोडून पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालण्यास सुरुवात केली आहे.मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयास अद्याप कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्याने अधिकाऱ्यांनी या विषयी मौन बाळगले आहे. तसेच पारवानगी देता येणार नाही, असे मोघम उत्तर देऊन पालिका अधिकारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वाटेला लावत आहेत. तसेच हे अधिकारी ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिके’तील अर्ज घेऊन येण्याची सूचना मंडळाच्या कार्यकर्त्यांना करीत आहेत. त्यामुळे मंडळांचे पदाधिकारी पुस्तिकेच्या प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.
पालिकेने वेळीच ‘गणेशोत्सव माहिती पुस्तिका’ प्रकाशित करणे गरजेचे आहे. या पुस्तिकेला विलंब झाल्यास उत्सवाच्या तयारीसाठी मंडळांना कमी वेळ मिळेल. त्यामुळे आणखी एका नव्या समस्येला तोंड देण्याची वेळ सर्वावरच येईल.
अॅड. नरेश दहिबावकर
अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 12:20 pm