गणेशोत्सवादरम्यान कोकणातल्या आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून असलेल्या चाकरमान्यांनो, आपली तिकिटे आरक्षित करण्यासाठी तयार राहा! कारण प्रवासाच्या १२० दिवस आधीपासून रेल्वे आरक्षणे सुरू होतील, या नियमानुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ातील गाडय़ांची आरक्षणे सुरू झाली आहेत. परिणामी १७ सप्टेंबर रोजी असलेल्या गणेश चतुर्थीचा मुहूर्त गाठण्यासाठी चाकरमान्यांना mu06आतापासून कंबर कसावी लागणार आहे.
कोकणातील आपल्या घरच्या गणपतीला जाण्यासाठी चाकरमाने आठवडाभर आधीपासूनच्या गाडय़ांची आरक्षणे करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे यंदा १७ सप्टेंबर रोजी असलेल्या गणेश चतुर्थीचा मुहूर्त गाठण्यासाठी चाकरमाने १२-१३ सप्टेंबरपासूनच्या गाडय़ांची आरक्षणे करणार आहेत. मात्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे आरक्षणाची मुदत १२० दिवसांवर नेऊन ठेवली आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यातील आरक्षणे मे महिन्यापासूनच सुरू झाली आहेत. त्यात १२ सप्टेंबरच्या तिकिटांचे आरक्षण शुक्रवार १५ मेपासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच्या दिवसांची आरक्षणेही याचप्रमाणे उपलब्ध होतील.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान मध्य व कोकण रेल्वे यांच्यातर्फे विशेष गाडय़ांची घोषणा केली जाते. मात्र त्याआधीच नियमित गाडय़ांची आरक्षणे हाती असण्याच्या दृष्टीने चाकरमान्यांची लगबग सुरू असते. यंदा मे महिन्याच्या सुटीत गावी गेलेल्या चाकरमान्यांना पुन्हा गणेशोत्सवात गावी येण्यासाठी तेथूनच ही आरक्षणे करावी लागणार आहेत.