मुंबई : दिल्ली, मुंबईसह देशातील काही राज्यांत  दहशतवादी हल्ल्यांबाबत देण्यात आलेला इशारा आणि  करोना प्रसाराचा धोका या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.  अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला  शनिवारी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले.

रविवारी  विसर्जनानिमित्त शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात राहणार आहेत. याशिवाय अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १०० अधिकारी, १५०० सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, ५०० गृहरक्षक, २७५ अंमलदार बंदोबस्ताला तैनात  असतील.

ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत  ५७ सराईत आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय अजामीनपात्र वॉरंटमधील ५५ आरोपीतांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थाच्या विक्री व सेवनप्रकरणी  ११८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकूण ३१ जणांवर कारवाई करून चाकू, तलवारी इत्यादी शस्त्रे जप्त  करण्यात आली आहेत.  अवैध दारू विक्री, जुगारप्रकरणी  ४८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये ७६ आरोपींवर कारवाई करण्यात आली.  हद्दपार  ४१  आरोपींना अटक करतानाच  एकूण १६० संशयित व्यक्ती व १३३  फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

शहरात  २२२ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील १,०८४ आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये २६७ आरोपी मिळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. शहरात एकूण १३६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ९,१४५ वाहनांची तपासणी करून त्यातील १,६१५ वाहन चालकांवर कारवाई के ली. यावेळी पाच मद्यपी चालकांवरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला. शहरातील ९४६ हॉटेल, लॉज, मुसाफिरखाने यांची, तसेच  ४९६ महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.  ६३ विसर्जनस्थळांवर  घातपातप्रतिबंधक तपासणी करण्यात आली.

नामांकित मंडळांना दोन तासांचा अवधी

लालबागच्या राजासह  सर्व मोठ्या मंडळांना दोन तासांत विसर्जन सोहळा पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गिरगांव आणि जुहू चौपाटीवर देखील कडकोट  बंदोबस्त ठेवला जाईल. शहरात अनेक ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल.