नियमावली लवकर जाहीर करण्याची मूर्तिकार, मंडळांची मागणी

मुंबई : अवघ्या शंभर दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवातील नियमावलीचे त्रांगडे अद्याप कायम असून मूर्तीची उंची आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर या मुद्दय़ांबाबत संभ्रम आहे. मंडळांनी मूर्तिकारांकडे मागणी नोंदवण्यास सुरुवात केली असली तरी सरकारी नियमावली जाहीर झाली नसल्याने मूर्तिकारांचा खोळंबा झाला आहे.

जून महिना उजाडला की मर्तिकार, गणेश मंडळे यांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. ठिकठिकाणी मूर्तिकारांच्या कार्यशाळा उभ्या राहतात, तर कुठे आयत्या गणेशमूर्तीनी  दुकाने सजतात. परंतु यंदा मागणी असूनही अद्याप मूíतकारांनी मूर्ती घडवण्यास सुरुवात के लेली नाही. गेल्या वर्षी राज्य सरकारने उशिरा नियमावली जाहीर केल्याने मूर्तिकारांचे नुकसान झाले. शासनाने पीओपी बंदी लागू केल्याने माती कुठून आणायची, कशी आणायची अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. यंदा हा गोंधळ टाळण्यासाठी मूíतकारांना राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग तीन महिने आधीपासूनच सुरू होत असल्याने सभा, बैठका घेऊन मंडळे मूर्तीसाठीची आगऊ नोंदणी करण्यासाठी मूर्तिकारांशी चर्चा करत आहेत. दरवर्षीचा शिरस्ता मोडून गेल्या वर्षी मंडळांनी मूर्तीची उंची ४ फु टांपर्यंत मर्यादित ठेवली. परंतु यंदा तरी उंच मूर्ती साकारल्या जाव्यात यासाठी मंडळांची धडपड सुरू आहे. ‘गतवर्षी परिस्थिती बिकट असल्याने मंडळांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. सध्याची परिस्थिती बघता करोनावर लस उपलब्ध आहे. तसेच मुंबईमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे यावर्षी उंचीची मर्यादा न लादता उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी. नियमावली जाहीर करताना मंडळांनाही विचारात घ्यावे,’ असे तेजुकाया सार्वजनिक गणेशोस्तव ट्रस्टचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी सांगितले.

पीओपीकडे कल

गेल्या वर्षी पोओपीच्या मूर्तीना उशिरा परवानगी मिळाली. परंतु सर्वाधिक विक्री ही पीओपीच्याच मूर्तीची झाल्याचे एकूण मूर्तिकारांशी झालेल्या चर्चेतून दिसते. मातीच्या मूर्ती वजनाला जड, हाताळण्यास नाजूक आणि किमतीने अधिक असतात. त्यामुळे घरगुती ग्राहकही मातीच्या मूर्ती खरेदी करण्याबाबत उदासीन असतात. मंडळांच्या मूर्ती आकाराने मोठय़ा असल्याने तेथे मातीच्या मूर्ती आणणे जिकिरीचे असते. शिवाय सध्या मंडळांपुढे आर्थिक आव्हान असल्याने मंडळांचीही पीओपीच्या मूर्तीनाच पसंती आहे. पीओपीच्या दोन फुटी गणेशमूर्तीची किंमत अंदाजे २ ते ३ हजार रुपये असते. त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीचे दर ५ ते ७ हजार रुपये आहेत. तर चार फुटी पीओपीची अंदाजे मूर्ती १० ते १५ हजार रुपये किमतीची असते तर शाडू मातीच्या मूर्तीना जवळपास ३० ते ४० हजार रुपये मोजावे लागतात.

गेल्या वर्षी नियम उशिरा मिळाल्याने अनेक मंडळांनी  निर्णय बदलले, काहींनी दुसरे पर्याय शोधल्याने मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले. यंदा नियमावली लवकर जाहीर होणे आणि पीओपीला परवानगी देणे गरजेचे आहे. मातीकामातली मेहनत आणि कारागिरांचा मोबदला अधिक असल्याने ग्राहकांना मातीच्या मूर्ती परवडत नाही. सध्या ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने त्यांच्याकडूनच पीओपी मूर्तीची मागणी होत आहेत. त्यामुळे मर्तिकाराच्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून सरकारने लवकर नियम जाहीर करावेत.

– संतोष कांबळी, मूर्तिकार