मुंबईतील मूर्तिकारांची मागणी

गणेश मूर्तीकलेची चाचणी परीक्षा घेतल्यानंतरच मूर्ती तयार करण्यासाठी मंडप घालण्याची परवानगी मूर्तिकारांना देण्यात यावी, अशी मागणी श्री गणेश मूर्तीकला समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ही परवानगी महापालिकेच्या पदपथांवर न देता खेळाची मैदाने आणि मोकळे भूखंड या ठिकाणी द्यावी. परवानगीचा अर्ज हा मराठी भाषेतच असावा आणि राज्यातील मराठी मूर्ती कलाकारांनाच प्राधान्याने परवानगी द्यावी, अशीही मागणी समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत राजे यांनी केली आहे.

यातून गणेश मूर्ती घडविणाऱ्या खऱ्या मूर्तीकाराला जागा मिळू शकेल आणि मूर्तीच्या बाजारीकरणाला आळा बसेल. तसेच या चाचणी परिक्षेसाठी कला क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि अनुभवी अशा गणेश मुर्ती कलाकारांची समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या समितीने दिलेले प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच अशा कलाकारांना मुर्ती घडविण्यासाठी परवानगी द्यावी. ही परवानगी मे महिन्यात द्यावी आणि त्याची मुदत घटस्थापनेपर्यंत असावी. त्याचबरोबर महापालिकेच्या विभागांनी एकाच नावाने परवानगी द्यावी, असे समितीचे म्हणणे आहे.