दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू चौपाटीवर बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. एकीकडे विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी चौपाटी परिसरात जमली आहे. सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मुंबईतील मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुका आता चौपाटीच्या दिशेनं येत आहेत. या मिरवणुकांमध्ये तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई, ढोल ताशांचे पथक, डिजे असं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. पण, तुम्हाला माहितीये आजपासून सत्तर एक वर्षांपूर्वी मुंबईतला गणपती विसर्जन सोहळा कसा होता? मग हा व्हिडिओ पाहाच.

मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या मुंबई पोलिसांनी त्या वेळच्या मुंबईतील गणेश विसर्जनाचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून डोळ्यात तेल घालून पोलीस भाविकांना सुरक्षा पुरवत आहेत. या उत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी हजारो पोलीस चौपाटी परिसरात गस्त देत आहे. तेव्हा मुंबईकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव धावून येणारे मुंबई पोलीस त्याकाळच्या विसर्जन सोहळ्याला अशीच सुरक्षा पुरवत होते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्याकाळच्या गणेश विसर्जनाचं स्वरूप आता मात्र पूर्णपणे बदललं असलं तरी मुंबई पोलीस मात्र त्याच निष्ठेनं मुंबईकरांना आजही सुरक्षा पुरवत आहेत.