गणेशोत्सवाआधी रस्ते चांगले करण्याचे आश्वासन देणाऱ्या पालिकेने गणेशमूर्तीच्या आगमन- विसर्जनाचे रस्ते दुरुस्त करण्याची काळजी घेतली असली तरी उर्वरित शहरातील खड्डय़ांनी मात्र गणेशभक्तांची वाट बिकट केली आहे. मुंबईतील खड्डय़ांनी दहा हजारांचा टप्पा गाठला असून त्यातील दीड हजाराहून अधिक खड्डे बुजविणे शिल्लक आहे. खड्डय़ांची संख्या पाहता गणेशोत्सवापूर्वी ते दुरुस्त होण्याची शक्यता मावळली आहे.
पावसाळ्यात पडणारे खड्डे गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून मोहीम हाती घेतली जाते. यावर्षीही १८ ते २३ ऑगस्टदरम्यान पालिकेने शहरातील रस्ते पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी ही मुदत संपली. महापालिका आयुक्त, महापौर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी शनिवारी रस्त्यांची पाहणी केली. आगमन आणि विसर्जनाच्या रस्त्यांचा पृष्ठभाग नीट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी दिली. गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी पालिकेने फारसा प्रतिसाद दिला नव्हता. यावेळी मात्र आगमन- विसर्जनाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहे. मात्र रस्ते उंचसखल झाल्याने मंडळांना काही प्रमाणात काळजी घ्यावी लागेल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर म्हणाले. खड्डय़ांची संख्या आणि बुजवण्यात आलेले खड्डे यातील दरीही दिवसागणिक वाढते आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ९९३८ खड्डय़ांची नोंद झाली असून त्यातील तब्बल १७०० खड्डे बुजवणे बाकी आहे.