सकारात्मक निर्णयाची आशा, परंपरा जपण्यासाठी धडपड

मुंबई : मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेशमूर्तींच्या प्रघातात करोनामुळे खंड पडला, परंतु यंदाच्या वर्षी ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’ असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्याने मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. ‘गेल्या वर्षी आम्ही नियमांची अंमलबजावणी केली. अनेक ठिकाणी उत्सवात खंड पडला, पण यंदा मात्र सरकारने मंडळांची भूमिका समजून घ्यावी,’ असे मंडळांचे म्हणणे आहे.

‘मूर्तीची उंची कमी करणे योग्य नाही. एक वर्ष सर्वांनीच सहकार्य केले, पण प्रश्न श्रद्धेचा आहे. आम्ही लोकांना ऑनलाइन दर्शन देऊ. आगमन-विसर्जनात केवळ निवडक कार्यकर्ते असतील. पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. फक्त यंदा उंच मूर्तीला परवानगी द्यावी एवढीच आमची मागणी आहे. तसे पत्रही आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे,’ असे ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले.

मूर्तिकारांचे म्हणणे..

‘गेल्या वर्षीच्या नुकसानीनंतर अनेक मूर्तिकारांनी कारखाने बंद केले. ज्या व्यवसायावर वर्षभर गुजराण करायचा, तो अवघा १० टक्क्यांवर आला तर मूर्तिकारांचे जगणे कठीण होईल. केवळ मूर्तिकारच नाही या व्यवसायावर हजारो कर्मचाऱ्यांचे पोट आहे. मंडळांकडूनही उंच मूर्तींची मागणी होते आहे. त्यामुळे आता सरकारनेही सारासार विचार करून उंचीबाबत सकारात्मकता दाखवावी,’ अशी प्रतिक्रिया मूर्तिकार विजय खातू स्टुडिओच्या रेश्मा खातू यांनी दिली.

समितीचा पुढाकार

सध्या करोनास्थिती नियंत्रणात असल्याने उंच मूर्तींना पाठिंबा द्यावा, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला केली आहे. यंदाच्या उत्सवात काय नियम असावेत याबाबतचे पत्र त्यांनी सरकारला दिले आहे. त्यानुसार उंचीची मर्यादा नसावी, पीओपीच्या निर्णयाबाबत तातडीने निर्णय घेणे, चौपाटी विसर्जनासाठी खुल्या कराव्यात, अशा प्रमुख मागण्या आहेत. तसेच मंडळांचा कल जाणून घेण्यासाठीही समितीने पुढाकार घेतला आहे.