कारागिरांना दिवसाला ४ ते ८ हजार रुपयांची बिदागी; १५ ते २० मिनिटांत एका मूर्तीला सोवळे

भाळी सुंदर शोभे केशराचा टिळा,

पिवळा पितांबर कैसा शोभुनी दिसला!..

या भजनात अपेक्षित असलेला पितांबर शोभून तेव्हाच दिसेल, जेव्हा त्याच्या निऱ्या, गाठी बेतास बात पडतील! त्यातून वीस ते बावीस फुटांच्या गणेशमूर्तीना ३० ते ५० मीटर लांबीचे पितांबर नेसवायचे म्हणजे त्यासाठी कसलेला गडीच हवा. म्हणून मुंबईत गणपतीला केवळ वस्त्र नेसविण्याचे कसब असलेल्या हातांना गणेशोत्सव काळात चांगलीच मागणी असते.

अनेक गणेश मंडळे दररोज गणेशमूर्तीची वस्त्रे बदलतात. त्यात १५ ते २० फूट उंचीच्या मूर्तीला रेशमी, भरजरी पितांबर नेसविणे हे मोठे जिकिरीचे काम बनते. त्यामुळे मोठमोठय़ा मंडळांकडून अशा कुशल कलाकारांना चांगलीच मागणी आहे. काही मंडळे तर अशा कलाकारांसोबत रीतसर करारच करतात. त्यात सोवळ्याचा रंग, सजावट निश्चित करून त्यानुसार गणेशमूर्तीला वस्त्रप्रावरणांनी सजविले जाते. यासाठी या कलाकारांना मिळणारा मोबदलाही थोडाथोडका नाही, प्रत्येक मूर्तीला ‘वस्त्रांकित’ करण्यासाठी दिवसाला ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत इतका मेहनताना या कलाकारांना मिळतो.

भायखळा येथे राहणारे प्रकाश लहाने गेली १० वर्षे गणपतीच्या मूर्तीना सोवळे नेसवण्याचे काम करीत आहेत. व्यवसायाने चित्रकार असणारे लहाने गणेशोत्सवात प्रत्येक दिवशी सुमारे १५ ते २० गणेश मूर्तीना सोवळे नेसवतात. पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत त्यांचे काम सुरू असते. मूर्तीच्या आकारानुसार सोवळ्याचे कापड ३० ते ५० मीटर लांब असते. मात्र लहाने यांचे कुशल हात अवघ्या १५ ते २० मिनिटात एका मूर्तीला सोवळे नेसवतात.

दहा वर्षांपूर्वी मूर्तीच्या कारखान्यात सजावटीच्या कामापासून लहाने यांनी सुरुवात केली. आता ते यात इतके तरबेज झाले आहेत की मूर्तीना लागणाऱ्या सोवळ्याबरोबरच मूर्तीच्या खांद्यावरील भरजरी शाल, सोवळे शोभून दिसण्यासाठी लागणारा कंबरपट्टा अशी इतर वस्त्रप्रावरणेही ते मंडळांना निवडून देतात. सध्या लहाने यांनी एका मोठय़ा मंडळाच्या मूर्तीसाठी ६० हजारांची सजावट केली आहे.

मूर्तीच्या उंचीनुसार ३०, ३५ तर कधी ३९ मीटर कापड सोवळ्यासाठी वापरले जातात. सोवळ्याची गाठ पक्की राहावी यासाठी दोन टोकांना सुपारी बांधली जाते. मोठी मूर्ती असल्याने एका व्यक्तीला हे शक्य नसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते, असे रूपेश पवार यांनी सांगितले. ‘लालबागच्या राजा’सह मुंबईतील १६ गणेश मंडळांची कामे त्यांच्याकडे आहेत.

मंडळाच्या मागणीप्रमाणे सोवळ्याच्या कापडाची निवड केली जाते. मात्र, सोवळ्याच्या निऱ्या, कमरेची गाठ याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते, असे विक्रोळी येथे राहणारे किशोर पवार सांगतात. त्यांच्याकडे खार, माहिम, सांताक्रूझ, घाटकोपर, विक्रोळी या भागातील १९ ते २० गणपतीच्या मूर्तीना धोतर नेसविण्याचे काम आहे.