News Flash

शाडूच्या मातीपासून कागदाच्या लगद्याकडे

मुंबईमधील गणेश मूर्तिकारांमध्ये पाटकर कुटुंबियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मुंबईमधील गणेश मूर्तिकारांमध्ये पाटकर कुटुंबियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार पूर्वी वासुदेव पाटकर गोव्यामध्ये गणेशमूर्ती साकारायचे. नंतरच्या काळात मुंबईमध्ये गणेशमूर्तीना मागणी वाढू लागली. त्यामुळे काही मंडळींच्या आग्रहावरून ते मुंबईत आले आणि शाडूच्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती घडवू लागले. त्यांची मुले नारायण, गणेश आणि विष्णू हेही त्यांना मदत करू लागले. हळूहळू या तिघांनी मूर्तिकला आत्मसात केली आणि तेही मूर्तिकार म्हणून नावारूपाला आले. आजघडीला गणेश आणि विष्णू हयात नाहीत. मात्र पाटकर परिवाराची पुढची पिढी याच क्षेत्रात कार्यरत आहेत.
नारायण यांचे पुत्र अविनाश यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मधून मूर्तिकलेचे शिक्षण घेतले आणि तेथेच एक वर्ष प्राध्यापक म्हणून कामही केले. त्यानंतर ते वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विभागीय नक्षीकाम केंद्राच्या सेवेत रुजू झाले. नोकरी सांभाळून ते कुटुंबाच्या पारंपरिक मूर्तिकाम व्यवसायातही लक्ष घालत होते. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्यात त्यांचा हातखंडा. शाडूची माती पर्यावरणस्नेही असली तरी ती पाण्यात विरघळण्यास वेळ लागतो आणि विरघळल्यानंतर काही अंशी त्याचा गाळ तयार होतो. त्यामुळे २००३ मध्ये त्यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला. शाडूच्या गणेशमूर्तीप्रमाणे कागदाच्या लगद्याची मूर्तीही सुबक बनली.
सुरुवातीला केवळ दोन-तीन मूर्तीच ते घडवीत होते. त्यांच्याकडे नियमितपणे गणेशमूर्ती घेण्यासाठी येणाऱ्यांना त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीचे महत्त्व पटवून सांगितले. वजनाला हलकी, पटकन विरघळणारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी कागदाच्या लगद्याची गणेशमूर्ती अनेक भाविकांना भावली आणि यंदा मागणीनुसार त्यांनी कागदाच्या लगद्याच्या २५ मनमोहक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यामध्ये १४ फूट उंच काळबादेवीचा राजा आणि आठ फूट उंच सायनच्या सार्वजनिक गणेसोत्सवाच्या गणेशमूर्तीचा समावेश आहे.
अविनाश पाटकर यांचे अख्खे कुटुंब सध्या गणेश कार्यशाळेत मूर्ती साकारण्यात रमले आहेत. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे अविनाश यांची पत्नी ज्योती, मुलगी गौतमी, बंधू आशीष, त्यांची पत्नी शिल्पा आणि त्यांचा १३ वर्षांचा मुलगा पीयूष यांची गणेशमूर्ती घडविण्यासाठी धावपळ सुरू आहे. यापैकी कुणी रंगकामात, तर कुणी नक्षीकामात तरबेज आहे. थोडक्यात ही सर्व मंडळी वासुदेव पाटकर यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.

आजोबांचा मूर्तिकलेचा वारसा जपताना एका मूर्तिकाराने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी केवळ पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारण्याचे व्रत घेतले आहे. या मूर्तिकाराची सुरुवात शाडूंच्या मूर्तीपासून झाली. परंतु, आता कागदाच्या लगद्यापासून मूर्ती घडविण्याचा ध्यास त्याने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे भाविकांनीही त्याच्या या व्रताला प्रतिसाद देत कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणेशमूर्तीना पसंतीची पावती दिली आहे.

कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती अशी घडते
कागदाच्या लगद्यापासून एखादी मूर्ती घडविण्यासाठी तिचा साचा बनविणे गरजेचे आहे. त्यामुळे हव्या त्या आकाराची शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारावी लागते. ही मूर्ती सुकल्यानंतर त्यापासून साचा तयार केला जातो. रद्दी वर्तमानपत्र साधारण एक दिवस भिजत ठेवावा लागतो. त्यानंतर भिजवलेली रद्दी मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्याचा लगदा तयार होतो. त्यात घाटी गोंद मिसळल्यावर या लगद्याला थोडा चिकटपणा येतो. या मिश्रणात व्हायटिंग पावडर मिसळून चपातीच्या कणिकाप्रमाणे मळण्यात येते. तयार झालेला लगदा साच्यामध्ये योग्य पद्धतीने भरण्यात येते. त्यानंतर स्टेन्सील ब्रशने ठोकून मूर्तीला आकार दिला जातो. साच्यातील लगद्यावर पपी गमने वर्तमानपत्रांचे तीन-चार थर चिकटविले जातात. दोन-तीन दिवस कडक उन्हात मूर्ती सुकविल्यानंतर चिकटविलेले कागदाचे थर काढून टाकले जातात आणि त्यावर कुंचल्यांनी आकर्षक असे रंग दिले जातात. मूर्तीला रंगकामाद्वारे आभूषणांचा साजही चढविला जातो आणि साकार होते वजनाला अत्यंत हलकी गणेशमूर्ती.

पारंपरिक मूर्तिकारांनी हा पर्याय अजमावा
शाडूची गणेशमूर्ती वजनाला जड असल्यामुळे ती घरी घेऊन जाताना भाविकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. त्या तुलनेत कागदाच्या लगद्यापासून घडवलेली मूर्ती वजनाला अत्यंत हलकी असते. १४ फूट उंच काळबादेवीचा राजा पाच भाविक सहज उचलून घेऊन जातात. तसेच या मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यात पटकन विरघळतात. त्यामुळे भाविकांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पुढे येऊन या मूर्तीची पूजा करावी. पारंपरिक मूर्तिकारांनीही या पर्यायाचा विचार करावा. त्यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल.
-अविनाश पाटकर, मूर्तिकार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 6:24 am

Web Title: ganesh murti by paper
टॅग : Ganapati
Next Stories
1 ११ एकरवरील सागरनगर झोपु प्रकल्पाला स्थगिती!
2 हार्बर मार्गाच्या डीसी-एसी परिवर्तनात दोन अडथळे
3 ‘अॅडलॅब इमॅजिका’च्या सेवेत बेस्टच्या गाडय़ा?
Just Now!
X