महागळतीचे विरोधकांनीच आत्मचिंतन करावे – मुख्यमंत्री

मुंबई/नवी मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नवी मुंबईतील तब्बल ४८ नगरसेवकांनी नवी मुंबईत तर काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात समारंभपूर्वक प्रवेश केला. नाईकांमुळे नवी मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे आयती आली आहे.

नाईकांचे पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘‘आमच्याकडे महाभरती सुरू असल्याचे विरोधक बोलत आहेत, पण खरे तर त्यांच्याकडे महागळती का सुरू आहे, याचे त्यांनीच आत्मचिंतन केले पाहिजे.’’ यापुढे गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा विकास  वेगाने केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यात सत्ता आमचीच येणार आहे. उत्सुकता केवळ आम्हाला किती जागा मिळणार याचीच आहे, असेही ते म्हणाले.

पक्षातील अनेक खासदार, आमदार आणि नाईक समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘‘गणेश नाईक यांनी राजकारणाची प्रचंड मोठी कारकीर्द गाजवली असून त्यांचा प्रवेश हा भाजपसाठी आनंदाचा क्षण आहे. गेली अनेक वर्षे गणेश नाईकांवर आमचा डोळा होताच; पण त्याची योग्य वेळ आज आली आहे.’’

गणेश नाईक यांनीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या धाडसी निर्णयाचे आणि कामाचे कौतुक केले. तर १५ वर्षे सत्तेत असूनही गावठाण विस्तार, एसआरए योजना वसाहतीच्या मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न पूर्णपणे सोडवता न आल्याची खंत व्यक्त केली. तर नवी मुंबईसारखाच  विकास भाजपच्या मदतीने सर्व महापालिकेत घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

एकच पक्ष!

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लोकांचा कल आहे. राज्यातील लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रामाणिकपणे काम करता येईल, असा भाजप हाच पक्ष उरला असल्याने मी भाजप-प्रवेश केला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

मुंबईतील गरवारे सभागृहात पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शेजारी बारामती मतदारसंघ असल्याने इंदापूरकडे जरा लक्ष द्यावे आणि मतदारसंघाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.

भाजपमध्ये मी विनाअट प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडीन. पुणे जिल्हाच नव्हे तर मंत्री-पालकमंत्री म्हणून १५ वर्षे काम केल्याने पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र संपर्क आणि जुने संबंध आहेत. पक्षाला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पाच वर्षे वाट पाहिल्यावर आता योग्यवेळी हर्षवर्धन यांचा भाजप प्रवेश झाला. अनेक मुख्यमंत्र्यांचे बुलेट प्रूफ जाकीट म्हणून त्यांनी काम केले. विरोधकांशी चांगले संबंध ठेवून सरकारवरील संकट दूर करण्याची त्यांची हातोटी मोठी आहे. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघविषयक मागण्या पूर्ण करू. महायुतीचे सरकार विधानसभेत भक्कम बहुमताने निवडून येईल व त्यात आता इंदापूरचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘‘हर्षवर्धन पाटील हे अखेर भाजपमध्ये आले. लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी जरी ते भाजपमध्ये आले असते तरी बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता. हर्षवर्धन खासदार झाले असते, सुप्रिया यांना घरी पाठवले असते,’’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

जुन्यांनी घाबरू नये!

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांची रीघ भाजपमध्ये लागल्यामुळे निष्ठावंतांमध्ये पसरत असलेल्या अस्वस्थतेची दखल घेत, भाजपमध्ये नवीन लोक येत असले तरी जुन्या लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असा दिलासा देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला. हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत करताना ते बोलत होते. इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोक भाजपमध्ये येत असल्याने महायुतीला २५० जागा मिळतील, असे भाकितही त्यांनी केले.