राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक भाजपात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी सोमवारीच भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत राजकीय भूकंप झालाय हे निश्चित अशात आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र या सगळ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

गणेश नाईक हे त्यांचे साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपात येत आहेत. त्यांना भाजपाबाबत काहीही आपुलकी नाही असा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला. एवढंच नाही तर बेलापूरमधून पुन्हा एकदा मलाच उमेदवारी देतील पक्षश्रेष्ठी मलाच न्याय देतील असाही विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

गणेश नाईक राजकीय स्टंटबाजी करत आहेत असा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाआधीच स्थानिक नेत्यांची धुसफूस समोर आली आहे. दरम्यान गणेश नाईक, संदीप नाईक आणि नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक हे सगळे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाआधीच मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना भाजपाविषयी आपुलकी नसल्याचं म्हटलं आहे.