सध्याचा जमाना स्मार्टफोन आणि थ्रीडीचा आहे. अशा अवस्थेत भक्तगणांचे लाडके दैवत असलेला गणराय या सर्वापासून दूर कसा काय राहील? यंदाच्या गणेशोत्सवात स्मार्टफोनच्या माध्यमातून थ्रीडी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची सोय देणारे एक नवे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये दाखल झाले आहे. सात मुंबईकर तरुणांनी एकत्र येऊन हे अ‍ॅप तयार केले आहे.
गुगल प्ले स्टोअरमध्ये सध्या वक्रतुंड या नावाने हे अ‍ॅप उपलब्ध आहे. ते डाउनलोड केल्यानंतर त्यासोबत मार्कर म्हणून वापरले जाणारे डिझाइनही कागदावर प्रिंट करावे लागते. त्याशिवाय इतर कोणताही कागद तुम्ही मार्कर म्हणून वापरू शकता. त्या मार्कर कागदावर स्मार्टफोन धरून तुम्ही कॅमेरा सुरू केलात की, समोर थ्रीडीमधील गणरायाची मूर्ती दिसू लागते.
महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तो मार्कर असलेला कागद गोल फिरवलात तर मूर्तीही त्यानुसार गोल फिरते. सर्व बाजूंनी ही थ्रीडी मूर्ती तुम्हाला पाहता येते. मार्करच्या कागदावर तुम्ही फूलही वाहू शकता.
सध्या आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या विराज पडतेला सुचलेल्या या कल्पनेला रोनक शाह, भाविक गाला यांनी अँड्रॉइड प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून आकार दिला. मयंक अंबालियाने वेबमास्टरमध्ये त्यावर काम केले, तर अमोघ पाटकरने मूर्तीची संकल्पना तयार केली. तर राहूल शर्मा आणि ब्रिजुल नायर यांनी ती थ्रीडी मूर्ती डिजिटल पद्धतीने साकारली. हे सर्व जण डी. जे. संघवी इंजिनीअिरग महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर तरी पडले आहेत किंवा सध्या तिथे शिक्षण तरी घेत आहेत.
याबाबत विराज पडते म्हणाला की, पर्यावरणस्नेही गणपतीसाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना आम्हाला ही कल्पना सुचली. मग उपलब्ध असलेल्या कमी पैशांत जेवढे करता येईल, तेवढे काम आम्ही केले. त्यासाठी बिटस्टूलॅब्ज नावाची एक लहानशी कंपनीही स्थापन केली. शनिवारपासून हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.