गणरायाच्या आगमनासह पुनरागमन केलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळी ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार सरींचा वर्षांव करत दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा शिडकावा झाला, त्यामुळे आरासदर्शनासाठी निघालेल्या गणेश पर्यटकांना पाऊस दर्शन मिळाले.
सायंकाळी चारनंतर कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरांत मुसळधार पावसाने गणेशोत्सव काळात नेहमीच पडणाऱ्या पावसाची चाहूल दिली. ठाण्यामध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही दिवसातून अधूनमधून संततधार सुरूच होती तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडासह पाऊस होता. त्यामुळे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी निघालेल्या गणेशभक्तांची  तारांबळ उडाली. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमध्ये पावसाचा जोर होता तर ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र रिपरीप सुरूच होती.
मुंबईवर ढगांची दाटी झाल्याने अंधारून आले होते. त्यानंतर सायंकाळी साडेसहा- सातच्या सुमारास मुंबईतही ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या. आता मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस ताल धरणार असे वाटत होते.  दीड दिवसांच्या गणपतीच्या निरोपाच्या मिरवणुकींना, भाविकांना पावसाचा तडाखा बसणार अशी चिन्हे होती. पण काही काळ रिमझिम सरींचा शिडकावा करत मुंबापुरीला चिंब केल्यावर थोडय़ाच वेळातच पावसाने आटोपते घेतले.
मुंबई शहरात अवघ्या दोन मिमी तर उपनगरात तीन मिमी पावासाची नोंद झाली. त्यामुळे तापमानतही फारसा फरक पडला नाही. मात्र, येत्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
तरुणाचा बुडून मृत्यू
वाडा तालुक्यातील कुडूस येथे मंगळवारी सायंकाळी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या प्रणव सुभाष पाटील (१९) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घरातील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रणव तलावात उतरला होता. त्या वेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची कुडूस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.