सार्वजनिक  मूर्ती चार फूट; घरगुतीसाठी दोन फुटांची मर्यादा, मिरवणुकांवर बंदी

मुंबई : गेल्या वर्षी करोनामुळे निर्बंधात साधेपणाने साजरा झालेला गणेशोत्सव यंदाही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. घरगुती श्रींची मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मूर्ती चार फुटाच्या मर्यादेत ठेवण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. त्यासह गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

करोना आणि गणेशमूर्तीच्या उंचीचा काय संबंध, असा सवाल करीत भाजपने निर्बंधांचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.  गणेशोत्सवाबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून करोना नियंत्रणासाठी राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देऊ नये, असे स्पष्ट निर्देश पालिका आणि जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. गणेशोत्सव मंडळांना महापालिका, स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल आणि त्यांच्या नियमानुसारच उत्सवाचे आयोजन करावे लागेल.

उंचीबाबत नियमावली ठरवण्यात आली असून भपकेबाजी आणि गर्दी टाळावी अशा सूचना देण्यात आल्या असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्याती विनंती मंडळांना करण्यात आली आहे. आरती वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनिप्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

पर्यावरणपूरकतेचा आग्रह…

गणेशमूर्ती शाडूची- पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो  घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी-देणगी कुणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

भाजपची टीका…

करोनामुळे नियम आवश्यक आहेत, पण गणेशमूर्तींच्या उंचीचा करोनाशी काय संबंध, गणेशोत्सव काय कराचीमध्ये साजरा करायचा, असे टीकास्त्र सोडत भाजप आमदार आशीष शेलार यांनी सरकारने निर्बंधांचा फेरविचार करण्याची मागणी केली. पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणेशोत्सव बंदिवासात, अशी टिप्पणीही शेलार यांनी केली.  माझ्या  घरातील गणेशमूर्ती दोनच फुटांची असावी, मंडळाच्या गणेशमूर्तीची उंची चारच फूट असावी, असे निर्बंध घालणारे सरकार कोण, त्यातून करोना कसा रोखणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

भपकेबाजी नको…

या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने सार्वजनिक मंडळांनी छोटे मंडप उभारावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी, असे स्पष्ट के ले आहे.

उंचीची मर्यादा…

गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फुटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे अशी सूचना करण्यात आली आहे.

आता गणपती अवघ्या ७० दिवसांवर आले असताना काही उंच मूर्ती तयार झाल्या असताना निर्बंध लागू केल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने या व्यावसायिकांना सरकारने  मदत द्यावी.  -अ‍ॅड. आशीष शेलार, भाजप आमदार