एका दिवसात ७४ मोबाइलवर डल्ला

गणेशोत्सव काळात लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ांना होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमध्ये संधी साधत चोरांनी तब्बल ९१६ मोबाइल  लंपास केल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्याहून विशेष म्हणजे, मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल ७४ जणांचे मोबाइल चोरीला गेले. यापैकी अवघ्या २९ प्रकरणांमध्येच चोरांना पकडण्यात यश आले आहे.

गेल्या काही वर्षांत चोरांनी पाकिटमारी किंवा बॅग लंपास करण्यापेक्षा महागडे स्मार्टफोन लंपास करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सप्टेंबर महिन्यात म्हणजे गणेशोत्सव काळात तर या चोरीने उच्चांक गाठला. लोकल गाडय़ा व लांब पल्ल्यांच्या मुंबईतून सुटणाऱ्या गाडय़ांना होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत संधी साधत चोरांनी हातसफाई केल्याचे दिसून येत आहे.

१  ते १७ सप्टेंबपर्यंत झालेल्या गुन्ह्यंमध्ये ९१६ गुन्हे मोबाइल चोरीचे असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. मात्र या सर्व गुन्ह्यंचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. फक्त २९ गुन्ह्यंचा यशस्वी तपास करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी ५६ मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर ११ सप्टेंबरला ६८, १६ सप्टेंबरला ६० आणि १७ सप्टेंबरला तब्बल ७४ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी लोहमार्ग पोलिसांकडे आल्या.